
अवकाळी पाऊस व क्यार वादळामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेद्वारे केले जात आहे. त्यासाठी शेतक-यांनी आपल्या झालेल्या नुकसानीबाबत माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र मिळणारी नुकसान भरपाई नेमकी कशाप्रकारे व किती प्रमाणात मिळणार याबाबत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाने तालुक्यातील भातशेती तसेच तत्सम पिकांचे नुकसान झाले आहे. यावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची एकत्रित बैठक घेवून ज्या शेतक-यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे त्यांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पंचनामे करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासकीय यंत्रणेचे काम सुरू आहे. मात्र अनेक शेतक-यांनी कापणी पूर्ण केल्याचे चित्र आहे. तसेच शासनाकडून नेमक्या किती प्रमाणात ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे हे स्पष्ट होत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
दुस-याची शेती कसत असल्याची अडचण
कोकणात विशेषत: ग्रामीण भागात अनेक शेतकरी दुस-याची शेती कसत असल्याचे चित्र आहे. अशावेळी वर्षभर मेहनत करून हाता-तोंडाशी आलेले पिक अवकाळी पावसाने उध्वस्त केले असताना मुळ जागा मालक अन्य असल्याने ही नुकसान भरपाई शेती कसणा-या शेतक-याला कशी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ही नुकसान भरपाई प्रत्यक्ष कसणा-या शेतकयांना मिळताना अवघड बनणार आहे. तर त्याचा लाभ जागा मालकाला होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांची ही मुख्य अडचण प्रशासन कशी दूर करणार? हे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
शासनाने अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई करण्याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र ही नुकसान भरपाई नेमकी किती गुंठयाला कसा दर असेल हे स्पष्ट केलेले नाही. तसेच कोणत्या पिकानुसार कसा दर असेल हे देखील कळलेले नाही. मागील 2 वर्षापूर्वी अशाचप्रकारे पंचनामा करून मदत देण्यात आली. यावेळी काहींना 50 रूपये तर काहींना 100 रूपये अशीही नुकसान भरपाई खात्यावर जमा झाली. यामध्ये कागदपत्र जमवाजमवीचा खर्चच मिळणा-या रक्कमेपेक्षा कधीकधी जास्त होतो. यावेळी देखील जर अशाचप्रकारे वाटप होणार असेल तर कोणी शेतकरी स्वत:हून यासाठी झटणार नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी दिलीप आग्रे यांनी बोलताना दिली.

































































