धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक कोसळला, खेड रेल्वे स्थानकानजीकची दुर्घटना; सुदैवाने मनुष्यहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकानजीकच्या सुकिवली गावानजीक धावत्या रोरो ट्रेनमधून मालवाहू ट्रक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून वेरना इथे जाण्यासाठी निघालेली रोरो दिवाणखवटी आणि खेड स्थानका दरम्यान असलेल्या सुकीवाली गावानजीक आली असता. रोरो वर बांधण्यात आलेला मालवाहू ट्रक अचानक निसटला आणि रेल्वे रुळावर आदळला. नेण्यात येत होते. स्टीलच्या प्लेट्स भरून रोरो रेल्वेनं गोवा इथं हा ट्रक नेण्यात येत होता. ट्रक आदळल्यामुळे झालेल्या प्रचंड आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले. पहाटेच्या साखर झोपेत असेलेले अनेकजण भूकंप झाला की काय या भीतीने घराबाहेर पडले. काळोखामुळे नक्की काय झाले, कुठे झाले, आवाज कसला आला हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते. त्यामुळे मनातील भीती क्षणाक्षणाला वाढत चालली होती.

काही धाडसी नागरिकांनी आवाज आलेल्या रेल्वे रुळाकडे जाऊन पाहणी केली असता रुळावर ट्रक कोसळल्याचे निदर्शनास आले आणि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. रेल्वे रुळावर कोसळल्या ट्रकमध्ये असलेल्या स्टीलच्या प्लेट्स सर्वत्र विखुरलेल्या होत्या. या प्लेट्समुळेच आवाजाची तीव्रता वाढली होती.

या विचित्र दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नसली तरी मालवाहू ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ट्रकची फक्त चाकं आणि सांगाडा घटनास्थळी अपघाताची भीषणता स्पष्ट करत होता. या अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. मात्र धावत्या रोरोतून ट्रक कसा निसटला? या दुर्घटनेला कारणीभूत कोण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहून काही काळ ठप्प झाली होती.