
खेड तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असतानाच चोरटयांनी ग्रामदेवतांच्या मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारण्यास सुरवात केली असल्याने गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटयांनी एकाच रात्रीत कोरेगाव चिंचघर धामणी आणि तिसे येथील मंदिरातील दानपेट्या फोडून दानपेटीतील रक्कम लांबविल्याचे उघड झाले आहे.
सध्या जिकडे तिकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहावयास मिळत आहे. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी वेगवेळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. काही गावांमध्ये, भजन कीर्तन तर काही ठिकाणी जाखडी नृत्याचे सामने रंगत आहेत. ग्रामस्थ गणेशोत्सवादरम्यान आयोजित केलेले कार्यक्रम पाहण्यात दंग असल्याचा फायदा उचलत चोरटयांनी आपले सारे लक्ष ग्रामदेवतेच्या मंदिरातील दानपेट्यांवर केंद्रित केले आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच रात्रीत चोरट्यांनी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिर, चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर, तिसे येथील काळकाई मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारला आहे.
सकाळी ही बाब पुजाऱ्याच्या निर्दर्शनास आल्यावर पुजाऱ्यांनी ग्रामस्थांना खबर दिली.गणेशोत्सवाची धूम सुरु असतानाच चोरटयांनी ग्रामदेवतांच्या दानपेट्या फोडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे बंदिस्त झाले आहेत. पोलीस सिसिटीव्ही फुटेजच्या साह्याने चोरट्यांचा माग काढण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.
दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून मंदिरात झालेल्या चोऱ्यांबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला. अलीकडे राजकीय पुढाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 30 -30 पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या चोरट्याने पकडण्यात पोलीस अपयशी ठरतात याबाबत माजी आमदार कदम यांनी नाराजी व्यक्त केली.



























































