
सामना प्रतिनिधी। खेड
शिमगोत्सवाची सांगता आणि संगमेश्वरच्या जाखमाता देवीच्या शिंपणे उत्सवानंतर मुंबईतून शिमगोत्सवासाठी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसला तुफान गर्दी झाली. खेड स्थानकावर गाडीचे दरवाजेच न उघडल्याने तिकीट काढलेल्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा घेऊन खासगी वाहनांनी मुंबईची वाट धरावी लागली.
शिमगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱया चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. शिमगोत्सवाची सांगता झाली की कोकणात आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघतात. संगमेश्वर येथील जाखमाता देवीचा शिंपणे उत्सव हा कोकणातील आणखी एक मोठा सण असतो. या उत्सवासाठी भाविक संगमेश्वर येथे दाखल झालेले असतात. शिंपणे उत्सव संपला की सारे चाकरमानी आणि भाविक परतीच्या प्रवासाला निघतात. शुक्रवारी जाखमाता देवीचे शिंपणे उत्सव पार पडल्यावर भाविक परतीच्या प्रवासाला निघाले असल्यामुळे कोकण रेल्वेला गर्दी झाली होती. मांडवी एक्स्प्रेसचे स्थानकात आगमन होताच प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी गर्दी केली, मात्र मागच्या स्थानकावरून बसून आलेल्या प्रवाशांनी दरवाजेच न उघडल्याने गाडीचे तिकीट काढलेले असतानादेखील प्रवाशांना गाडीत चढता आले नाही.

























































