
कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स कोरोना काळात आठ ते दहा महिने बंद आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो तरुणांच्या उपजीविकेचा प्रश्न अक्षरशः टांगणीला लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात या व्यवसायाचे तीनतेरा वाजले असल्याने कोकण किनारपट्टीवर वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात हजारोच्या संख्येने वॉटर स्पोर्ट्सवर उपजीविका करणारे तरुण आहेत. मागील दहा महिने कोरोनामुळे वॉटर स्पोट्र्स बंद आहेत. परिणामी लाखो रुपयांची कर्जे काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांवर बँकांकडून जप्तीची कारवाई सुरू आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना वॉटर स्पोर्ट्स बंद असल्याने त्याचा परिणामही पर्यटनावर होत आहे.
नियमांचे पालन करूनच होणार व्यवसाय सुरू
वॉटर स्पोर्ट्सला मंजुरी मिळावी म्हणून मेरिटाईम कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली आहे. यासोबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स सुरू व्हावेत, याबाबत निवेदनेही आम्ही आपल्याकडे सादर करत आहोत. कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत आपण आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
































































