राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या दुर्गवाडी पाटीलवाडीने राष्ट्रवादीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रविवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वाडीतील नेतृत्व आणि गावचे उपसरपंच प्रभाकर पाटील यांच्यासह संपूर्ण वाडीने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्याने राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. या विभागात आ. चव्हाण यांनी केलेल्या विकासाचे हे यश असल्याचे मानले जात आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेत स्वागत केले.

शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी गावाचे फार मोठे योगदान आहे.  मात्र येथील पाटीलवाडी ही वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची पाठराखन करणारी वाडी. बहुतांशी गाव हा शिवसेनेच्या पाठीशी असला तरी काही वाड्या या राष्ट्रवादीत आहेत. मात्र यातील पाटीलवाडी ही महत्वाची मानली जात होती. या वाडीचे आणि गावचे नेतृत्व उपसरपंच प्रभाकर पाटील करीत आहेत. मात्र यावेळी उपसरपंच पाटील यांच्यासह वाडीने राष्ट्रवादीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

मुळात दुर्गवाडी या विभागात आ.चव्हाण यांनी करोडो रुपयांची विकास कामे केली आहेत. ज्या ठिकाणी दोन तीन घरे असतील अशा ठिकाणीही आणि विरोधात असणाऱ्या वाडयांमधूनही आ.चव्हाण यांनी विकासाची कामे केली आहेत. राजकारण विरहित विकासकामे होत असल्यानेच या वाडीने केवळ विकास करणाऱ्या आ.चव्हाण यांना पाठींबा देत प्रवेश केला. यावेळी आ.चव्हाण यांनी सांगितले की, या विभागाने आपल्यावर विश्वास ठेवला म्हणूनच मला या ठिकाणी विकास कामे करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. विकासकामे आणि राजकारण आपण वेगवेगळे समजतो म्हणूनच मोठ्या संख्येने जनता माझ्याबरोबर येत असून तुमचा विश्वास जपण्याचे वचन मी देतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.