तज्ञ डॉक्टरांचा अभाव, ईसीजी मशीन धूळ खात पडून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतून मिळालेल्या निधीतून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांना 602 ईसीजी मशीन पुरविण्यात आल्या होत्या. पण ईसीजी रिपोर्टमध्ये दाखविण्यात आलेले निर्देश समजून त्याप्रमाणे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याचे तज्ञ डॉक्टर या संस्थेत उपलब्ध नाहीत. परिणामी या पुरविण्यात आलेल्या ईसीजी मशीनचा काहीच उपयोग होत नसल्याचे, बुधवारी झालेल्या आरोग्य समिती सभेत उघड झाले.

22 जानेवारीला जिल्ह्यातील 1 ते 19 वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहेत. तर पुढे गेलेली प्लस पोलिओ मोहीम 10 मार्च रोजी होणार आहे. जिल्ह्यात कुटुंब कल्याणचे 48 टक्के काम डिसेंबरपर्यंत झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या प्रसूतीमध्ये 2836 प्रसूती शासकीय तर 1897 प्रसूती खाजगी आरोग्य संस्थेत झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात माकडतापाचे 3 रुग्ण आढळले असून 9 मृत माकड मिळाले आहेत. तर 780 क्षयरोग रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीच्या 2 कोटी 51 लाख, 99 हजार 800 रुपये खर्चाला तर इळये प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीच्या 34 लाख खर्चाच्या अंदाजपत्रकास शिफारस देण्यात आली. यावेळी देवगड ठाकूरवाडी आरोग्य उपकेंद्रातील पाच गुंठठे पैकी 2 गुंठे जागा ठाकूरवाडी ग्राम पंचायतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शवविच्छेदनसाठी 15-15 दिवसांची नियुक्ती

वैभववाडी तालुक्यात शवविच्छेदनसाठी लागणारा ‘शवविच्छेदक’ उपलब्ध नसल्याने पूर्ण तालुक्यात मृतदेहाचे शवविच्छेदन करावयाचे झाल्यास ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेकाकडे बोट दाखवत होते. सभापती लक्ष्मण रावराणे आरोग्य सभेत नेहमीच याबाबत आवाज उठवत होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बैठक घेत महिन्याच्या 1 ते 15 तारीखपर्यंत ग्रामीण रुग्णालय तर 16 ते 30 किंवा 31 तारीखपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र ही जबाबदारी घेणार आहे.