
मुंबई–गोवा महामार्गाचे काम तब्बल 17 वर्षांपासून रखडलेले असताना सरकार, प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे कोकणवासीयांचा संयम अखेर तुटला आहे. अपघात, वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जनभावनेचा स्फोट म्हणून ‘मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी संगमेश्वर येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कोकणाच्या विकासाचा कणा असलेला हा महामार्ग केवळ आश्वासनांचा ढिगारा ठरला असून, रोजच्या अपघातांत निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तरीही सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या अन्यायाविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि रखडलेल्या कामाचा जाब विचारण्यासाठी सकाळी १० वाजता संगमेश्वर बस स्थानकासमोर हे आंदोलन छेडले जाणार आहे.
“आता केवळ निवेदनांवर विश्वास नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” अशी ठाम भूमिका जनआक्रोश समितीने मांडली असून, या आंदोलनात कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने तातडीने काम पूर्ण करण्याची ठोस हमी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
























































