तब्बल तीन दिवसांनंतर कोकण रेल्वे पुर्ववत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वे मार्गावरील कशेडी येथे घसरलेले मालगाडीचे नऊ डब्बे तब्बल तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हटविण्यात आले. त्यामुळे गेले तीन दिवस दिवाणखवटी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आलेली पार्सल व्हॅन सकाळी ९.१५ वाजता गोव्याकडे रवाना झाली. तसेच खेड स्थानकात थांबून असलेली पार्सल व्हॅन गुजरातकड़े रवाना झाली.

तुर्भे येथून गोवा येथे खत घेऊन चाललेल्या मालगाडीचे नऊ डब्बे सोमवार दिनांक ११ मे रोजी दिवाण खवटी नजीकच्या वावे पुलाजवळ रुळावरून घसरले होते. यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. या मार्गावरून धावणाऱ्या सर्व पार्सल गाड्या, ठिकठिकाणी अडकून पडल्या होत्या.

कोकण रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनसार या अपघातात रेल्वे रुळ आणि स्लिपर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुमारे 700 मीटरचा रुळ आणि स्लिपर्स बदलण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने कोकण रेल्वेचे 750 कर्मचारी आणि अधिकारी गेले तीन दिवस रात्रं-दिवस काम करत होते. अखेर आज सकाळी रुळ आणि स्लिपर्स बदलण्याचे काम पुर्ण झाले आणि दिवाण खवटी येथे गेले तीन दिवस उभी असलेली पार्सल व्हॅन गोव्याकडे रवाना झाली. त्यानंतर लगेचच खेड स्थानकात थांबवून ठेवलेले गोव्याहून गुजरात येथे जाणारी पार्सल व्हॅन गुजरातकडे मार्गस्थ झाली.

या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या या अपघाताची रत्नागिरी येथे चौकशी होणार असून त्यानंतर अपघातांचे तांत्रिक कारण स्पष्ट होणार असल्याचे रेल्वे सुत्रांकडून सांगण्यात आले.