
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद निष्ठा यात्रेचा झंझावात उद्या शुक्रवार दि.16 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत पोहचणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता रत्नागिरी शहरातील जलतरण तलावासमोरील मैदानात शिवसंवाद निष्ठा यात्रा आयोजित करण्यात आली असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम हे दोघे शिवसेनेशी गद्दारी करत शिंदे गटात गेले. त्यापाठोपाठ चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याची शिवसंवाद यात्रा महत्वाची ठरणार आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून गद्दारांना धडा शिकविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे उद्या सकाळी साडे दहा वाजता रत्नागिरी विमानतळावर आगमन होईल. तिथून ते साळवी स्टॉप जलतरण तलाव येथील शिवसंवाद यात्रेला उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, माजी आमदार सुर्यकांत दळवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी 15 हजारहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असून शिवसंवाद यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेले आदित्यपर्व बॅनरनी वातावरण भगवेमय झाले आहे. सर्वत्र भगवा जल्लोष असून शिवसैनिक आणि युवासैनिक मेहनत घेत आहेत.
रत्नागिरीतील शिवसंवाद यात्रेनंतर शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे संगमेश्वरकडे रवाना होणार आहेत. संगमेश्वरात आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर चिपळूणात डिबीजे कॉलेजसमोर शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या ऑफिस येथे दुपारी दोन वाजता निष्ठावान शिवसैनिक आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता दापोलीतील केळस्कर नाका येथे शिवसंवाद यात्रा होणार आहे. यामध्ये शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.


























































