लाल डबा हवा हवासा

प्रशांत येरम,prashant.yeram@gmail.com

कोकणात कोणत्याही बस आगारात जा नाहीतर एखाद्या बस स्टॉपवर… लाल डबा आला की, गावकऱयांच्या उडय़ा पडतात. कारण ती त्यांची जीवनवाहिनी आहे. तिच्या वेळा ठरलेल्या… त्यात कुठेही बदल होत नाही. (हां, पाच-दहा मिनिटे मागे-पुढे होतात, पण ती येतेच). त्यामुळे कोकणातील लोकांचा या लाल डब्यावर खूप ‘भरोसा’ आहे.

लाल डबा म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची गाडी… एसटी… गेली ५० वर्षे ही एसटी सेवा अव्याहतपणे सुरू आहे. बीएसआरटीसी नावाने सुरू झालेली प्रवासी वाहतूक कंपनी. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर एमएसआर टीसी या नावाने महामंडळाचा कारभार सुरू झाला.

कोकणातल्या अगदी छोटय़ा-छोटय़ा गावांमधील वाडय़ा-वाडय़ांवर आज हा लाल डबा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मुलांच्या शाळेच्या वेळा पाळत ही सेवा सुरू असते. सुरुवातीला एसटीच्या हिरव्यागार रंगाच्या कडक आवरणाच्या सीट जाऊन मग निमआराम गाडय़ा सुरू झाल्या. त्यात प्रवाशांच्या सुखकर प्रवासाचा विचार महामंडळाने केला. साध्या गाडय़ा, शहर गाडय़ा, निमआराम गाडय़ा, मिनी बसगाडय़ा, डिलक्स बसगाडय़ा आणि वातानुकूलित बस गाडय़ा अशा वर्गवारीत या गाडय़ा कोकणात प्रवाशांना वेळेवर सेवा देत आहेत.

महामंडळाने कायम आपल्या प्रवाशांचा विचार करत त्यांच्या सुविधांचा विचार करत वेगवेगळे प्रयोग कायम केले आहेत. लाल डब्यापासून ते आता शिवनेरी, अश्वमेधसारख्या वातानुकूलित गाडय़ा प्रवाशांसाठी आणल्या आहेत. अर्थात, हे जरी खरे असले तरी लाल डब्यातून फिरण्याची मजा काही औरच असते. कारण त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा क्वचितच ‘व्हाइट कॉलर’ असतो. त्यामुळे प्रवासात  होणारी, कधी-कधी नकोशी वाटणारी गर्दी, आरडाओरड, शिव्या यांची जुगलबंदीही निवांतपणे (स्वतःला) अनुभवता येते.

सर्वसाधारणपणे प्रत्येक गावचा बाजारहाट हा एका ठराविक दिवशीच असतो. त्यामुळे त्या दिवसाला तर लाल डब्याच्या जवळ जशा मधमाश्याच्या पोळय़ाजवळ मधमाश्या असतात तशीच कोकणातील माणसे पाहायला मिळतात.लाल डब्याचा कंडक्टर (वाहक) कधी दारात तर कधी खाली उभा राहून ‘‘गे मावशे, गो चेडवा, गे आवशी’’ अशा प्रेमळ हाका मारत त्यांना चढण्यासाठी सांगत असतो.

सेवेचा चढता आलेख!

साधी सेवा – (जलद सेवा – १९६८ पासून रात्रसेवा सुरू)

निमआराम – (हिरकणी १९८२ पासून सुरू)

वातानुकूलित – (१९९६ पासून मुंबई-पुणे मार्गावर सुरू)

शिवनेरी – (व्होल्वो वातानुकूलित २००२ पासून सुरू)

शिवनेरी स्लिपर कोच – (भाडे तत्त्वावर २००२ पासून सुरू)

शीतल (निमआराम वातानुकूलित २०१० पासून मुंबई-पुणे सुरू)

हिरकणी – निमआराम (जागतिक महिला दिनी २०१३ मध्ये निमआराम बसचे ‘हिरकणी’ असे नामकरण झाले.)

अश्वमेध – (वातानुकूलित बस २०१७ पासून सुरू)

शिवशाही – (वातानुकूलित बस आता बोरिवली – मालवण जाणार)