
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास पावसाळी अधिवेशन काळात 3 जुलै या महिला मुक्ती दिनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब् कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी हे घंटानाद आंदोलन छेडले. यावेळी अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी कल्याण संघटनेच्या अध्यक्षा उषा लाड, शितल सावंत,सुचित्रा मुणगेकर, पूजा जाधव, वैशाली केसरकर, सुषमा डगरे, संजना तांबे यांच्यासह अनेक अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी उपस्थित होत्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो… अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचा विजय असो.. आमच्या मागण्या मान्य करा… हम सब एक है आदि विविध घोषणा देत अंशकालीन स्त्री परिचरांना मंजूर करण्यात आलेले वाढीव मानधन त्वरित देण्यात यावे, चुकीच्या गैझेटद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर केलेली कारवाई रद्द करावी, शासकीय इमारतीमध्ये जागा दिलेल्या संघटनाकडून थकित भाड़े वसूल करावे, अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत आरक्षण देण्यात यावे, नसलेल्या आरक्षणानुसार जिल्हा परिषदेने केलेल्या भरतीची चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घंटानाद आंदोलन केले.
































































