
सामना प्रतिनिधी। कोपरगाव
कोपरगाव शहरातील इदगाह मैदान गिरमे चाळ जवळ राहणाऱ्या मोहन जगन्नाथ डंबीर यांच्या घराला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात फ्रिज इन्व्हेटर जळून खाक झाले. तर भांडे मांडणी, भिंती व फर्निचरला ही आगीची धग पोहचली आहे. तसेच या आगीत डंबीर यांचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहीती आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
इदगाह मैदान गिरमे चाळ येथील मोहन डंबीर हे कुटूंब कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या स्वयंपाक घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. त्यावेळी त्यांचा मुलगा निखील डंबीर हा शेजारच्या खोलीत झोपलेला होता. काहीतरी जळाल्याचा वास आल्याने त्याला जाग आली. त्याने शेजारच्याच्या मदतीने बोअर सुरू करून आग विझविली. त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेची अग्निशमन गाडी आली. तोपर्यंत आग विझली होती. मात्र फ्रिज, इन्व्हेटरसह घरातील संसारोपयोगी वस्तू, भांडे, कपडे आदींचे मोठे नुकसान झाले असून काही हजारांचे नुकसान झाले आहे.































































