कोपरगाव पंचायत समिती सभापतीपदी पूर्णिमा जगधने तर उपसभापती अर्जुन काळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे गटाच्या पौर्णिमा राहुल जगधने यांची सभापतीपदी तर अर्जुन प्रभाकर काळे यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एकही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध जाहीर झाली. कोपरगाव पंचायत समितीत सभापतीपद हे अनुसूचित जाती जमाती महिलासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सुरेगाव गणातील पौर्णिमा राहुल जगधने यांची सभापतीपदी तर खुल्या गटासाठी असलेल्या कोळपेवाडी गणातील अर्जुन प्रभाकर काळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगळवारी सकाळी पंचायत समिती सभागृहात झालेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोर्णिमा जगधने व उपसभापती पदासाठी अर्जुन काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज पीठासन अधिकारी पंकज चौबळ यांच्याकडे दाखल केले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे उपस्थित होते. सभापती व उपसभापती पदासाठी केवळ एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतीपदी पोर्णिमा जगधने व उपसभापतीपदी अर्जुन काळे यांची पीठासन अधिकारी पंकज चौबळ यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालूक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने मी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवून सत्ता दिली. ग्रामीण भागाच्या विकासाची परंपरा यापुढेही अशीच सुरु ठेवा. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या सहकार्याने ग्रामीण भागाच्या गतीमान विकासाचा रथ असाच प्रगतीपथावर ठेवा असा सल्ला दिला.

नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचे आमदार आशुतोष काळे यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. नवनिर्वाचित सभापती पोर्णिमा जगधने म्हणाल्या की, आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून दिलेल्या संधीचे सोने करू. उपसभापती अर्जुन काळे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागील अडीच वर्षात केलेल्या प्रयत्नातून ग्रामीण विभागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. यापुढेही शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी अनुसया होन, अनिल कदम, कारभारी आगवण, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, विमल आगवण, सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कैलास राहणे, वर्षा दाणे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.