कोपरगाव – उसाच्या फडाला आग, 5 एकरावरील ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील टाकळी हद्दीलगत भास्कर खंडीझोड यांच्या शेतातून जाणारी महावितरणची रवंदा सबस्टेशनची मुख्य वीज वाहिनी बुधवारी (21 डिसेंबर) भर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक तुटली. त्यामुळे शेतातील तोडणीला आलेल्या उसाच्या फडाला आग लागून पाच एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. या घटनेत कोणती जीवितहानी झाली नसून शेतकऱ्यांचे अंदाजे सहा ते सात लाख रुपये नुकसान झाला आहे.

दरम्यान, सरपंच संदिप देवकर, शेतकरी रंजनाताई आढाव यांनी याबाबत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना फोनवरून माहितीदेताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी यांचे अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी आणले. तोपर्यंत आगीचा फैलाव रोखण्यासाठी सरपंच संदिप देवकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, शेतकरी कैलास जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी धाडस दाखवत उसाचे हिरवे पाचट तोडून बांधावरील पेटलेले गवतावर आपटत ते विझवले. त्यामुळे बांधापलीकडील आगीचा फैलाव थांबला.

तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषद व संजीवनीचे अग्निशमन बंब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एका तासात आग आटोक्यात आणली. परंतू या आगीत भास्कर खंडीझोड यांचा तीन एकर व कैलास जाधव यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाला. येथे वीजवितरण कंपनी अधिकारी यांनी पोहचून घटनेचा पंचनामा केला आहे. काही महिन्यांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी सदर वीज तारा व कंडक्टर जुन्या झाल्याने बदलण्यात यावा, अशी मागणी लेखी स्वरुपात केली होती. मात्र महावितरण विभागाने दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.