कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, सरपंचांकडून पिंजरा लावण्याची मागणी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात घारी, हिंगणवेडे येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून देर्डे कोऱ्हाळे ते घारी या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी घारीचे सरपंच रामदास जाधव यांनी केली आहे.

या परिसरात काल पवार वस्तीवरील कुत्रे बिबट्याने ठार करून फस्त केले, तर देर्डे कोऱ्हाळे हिंगणवेडे परिसरात रात्रीच्या वेळी अनेक शेळ्या, मेंढ्या, बकरी, कोंबड्या व कुत्री बिबट्याने ठार करून फस्त केलेल्या आहेत. या बिबट्याच्या धास्तीने रात्री शेतात जाण्यासाठी शेतकरी फारसे धजावत नाही. विद्युत वितरण कंपनीकडून आठवड्यातून दिवस-रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी चालू करण्यासाठी विद्युत पुरवठा असतो.

या परिसरात बिबटे, तरस, रानडुक्कर आदींचे प्रमाण वाढल्याने हे वन्य प्राणी केव्हा आणि कधीही हल्ला करू शकतात, या धास्तीने शेतकरी रात्री आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आणि शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची लागवड झालेली असून या कांदा पिकांना अजून एक ते दोन पाण्याची गरज असल्याने शेतकरी बिबट्याच्या धास्तीने अडचणीत सापडला आहे. वन विभागाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच रामदास जाधव यांनी केली आहे.