भगरीच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्याने तिघांना विषबाधा, कोपरगाव येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरात पॅकिंग केलेल्या भगरीच्या पिठापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्याने तीनजणांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शहरातील धरम कानकुबजी यांनी बाजारातून बंद पाकीटमधील भगरचे पीठ आणून त्याचे बनवलेले पदार्थ खाल्ले. यानंतर काही वेळातच त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीला उलटय़ा, जुलाब सुरू झाले. त्यांना तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर धरम कानकुबजी व त्यांच्या कुटुंबीयांना घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांनी भगरीतून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं. पा. शिंदे यांनी अन्नसुरक्षा अधिकारी रा. ना. बडे यांना तपासासाठी पाठविले असल्याची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत अनेक ठिकाणी भगरीचे साठे जप्त करण्यात आले आहेत. नागरिकांना नवरात्र उपवास काळात पदार्थ तयार करताना घ्यावयाच्या काळजीबाबत आवाहन करण्यात आल्याची पत्रके प्रसिद्ध केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.