
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. गिरवली (ता. आंबेगाव) येथील कृष्णवाडी येथे कोयता घेऊन दोन अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि दागिने लंपास केले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. ही वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील घटना ताजी असतानाच पुन्हा गिरवली कृष्णवाडी येथे चोरीची घटना घडली. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीच्या खालील बाजूच्या भिंतीच्या विटा काढून भिंत फोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील महिलेच्या कानातील व गळ्यातील सोन्यांचे दागिने कोयत्याचा धाक दाखवत हिसकावून घेतले आणि रोख रक्कमही नेली. एकूण 98 हजार 740 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याबाबत रमेश विष्णु अभंग यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पवार करत आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटून दहशत निर्माण करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच पोलीस ठाणे परिसरात अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सामान्य नागरिक, महिला यांना याचा अफाट त्रास होत आहे. यावर देखील पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे महिलांनी सांगितले.

























































