आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

शिवसेना नेते– युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज 10 जानेवारीपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी त्यांच्या हस्ते म्हाडा कला व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व संभाजीराजे क्रीडा संकुलातील सुविधांच्या कामांचे भूमिपूजन होईल. शुक्रवारी नाशिकरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी दिली.

दिंडोरी रोडवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात म्हाडा कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 10 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ या योजनेतून सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियममधील विविध सुविधांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या विविध सुविधांच्या कामांचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी 6 वाजता संभाजीराजे क्रीडा संकुल येथे होणार आहे.

नाशिकरोड येथे खासदार गोडसे यांच्याच प्रयत्नांतून पावणेसात कोटी रुपयांचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल साकारण्यात आले आहे. या संकुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, 11 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता या संकुलातच होणार आहे. यानंतर तेथेच सेल्फ डिफेन्सचाही कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत, असेही भाऊ चौधरी यांनी कळविले आहे.