गुलालाच्या उधळणीत कृष्णामाई उत्सवाची सांगता, श्री क्षेत्र महाबळेश्वरला पर्यटकांनी अनुभवला सहा दिवस सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी’, कृष्णाबाई महाराज की जय… अशा जयघोषात श्री महाबळेश्वर येथे कृष्णाबाईच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून पारंपरिक मिरवणूक उत्साहात बुधवारी पहाटे सूर्येदयाच्या लालीबरोबर गुलालाच्या उधळणीत पार पडली. त्याचबरोबर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची सांगता मोठय़ा दिमाखात झाली. भल्या पहाटेचा हा नेत्रदीपक सोहळा स्थानिकांसह परगावच्या भाविक व पर्यटकांनीही अनुभवला.

कृष्णाबाईचा उत्सव कृष्णा नदीकिनारी दरवर्षी वाई, कराडसह अन्य भागात मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, या उत्सवाची सांगता श्री महाबळेश्वर येथे कृष्णेच्या उगमस्थानी पारंपरिक पद्धतीने भल्या पहाटे साजरा होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे. कृष्णा नदीच्या उगमस्थानाबरोबर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे कोयना, वेण्णा, सावित्री, गायित्री अशा पाच नद्यांचे उगमस्थान असल्याने पंचगंगेच्या उगमस्थानातील सांगता सोहळ्यास त्यादृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. श्री कृष्णादी पंचगंगा देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र महाबळेश्वर यांच्या वतीने व सर्व क्षेत्र महाबळेश्वरवासीयांच्या वतीने हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो.

फाल्गुन वद्य प्रतिपदेला ‘श्रीं’च्या प्रतिमेस सुवासिनींच्या हस्ते अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा, महाआरती केल्यानंतर पंचगंगा मंदिरापर्यंत श्री कृष्णाबाईच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. दुसऱया दिवशी श्रीसुक्त पठण, अभिषेक, धूपारती, नैवेद्य, भजन, मंत्रपुष्पांजली व दुपारी महाप्रसादाचे आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यादरम्यान पंचगंगा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच रंगीबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली. परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आला.

उत्सवाच्या शेवटच्या तथा सहाव्या दिवशी पहाटे होणाऱया सांगता सोहळ्यासाठी सारे ग्रामस्थ मंदिर परिसरात हजर झाले. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीकृष्णाबाईच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली. टेम्बा त्यापाठोपाठ पालखी मिरवणूक निघाली. पंचगंगा मंदिर, समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती, महाबळेश्वरचे शिवमंदिर, कमलजा माता मंदिर, अतिबलेश्वर मंदिर, होळीचा माळ, कोटेश्वर मंदिर व पुन्हा पंचगंगा मंदिर अशी नगरप्रदक्षिणा घातली. वाटेत भाविकांनी कृष्णामाईचे पूजन करत तिचे दर्शन घेतले.

पालखी पंचगंगा मंदिरात आल्यावर कीर्तनकार भास्करबुवा काणे यांचे कीर्तन झाले. नंतर पंचगंगा कुंडातील पंचगंगा तीर्थाचे गंगा पूजन पंरपरेनुसार कीर्तनकार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नवसपूर्ती व नवस बोलले जातात. भक्तांची मनोकामना कृष्णाबाई पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर बाळसंतोष तथा छोटय़ा बालकांना आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम झाला. गंगा पूजनावेळी कुंडातील पाण्यामध्ये दिवे खेळविण्यात आले. याबरोबरच कृष्णाबाई उत्सवाची सांगता झाली. दोन वर्षांनंतर कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता.