सौभाग्यकांक्षिण रंगभूमीचा रंगतदार प्रवास

>>क्षितिज झारापकर<<

kshitijzarapkar@yahoo.com

‘‘चि. सौ. कां. रंगभूमी’’ रसिकराज आणि रंगभूमीचे लडिवाळ नाते रंगभूमीच्या प्रवासातून खुलत जाते.

मराठी रंगभूमीची सुरुवात ही संगीत नाटकांपासून झाली असं नमूद आहे. सुरुवातीचं मराठी रंगभूमीचं शतक हे संगीताच्या सावलीत गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. साहजिकच आहे हे कारण त्या काळी सिनेमा काय साधे फोटोही प्रचंड दुर्मिळ होते, रेडियो अस्तित्वातच नव्हता आणि टेलिव्हिजन ही संकल्पनादेखील कुणाला सुचली नव्हती. आता या अशा काळात जनांच्या मनाचं मनोरंजन हे रंगकर्मी स्वतः जिवंतपणे व्यासपीठावरून कला सादर करून करत होते. असाही एक प्रवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू व्यंकोजीराजे भोसले हे दक्षिणेत तंजावर येथे स्थाईक झाले आणि तिथे त्यांनी नाटकांची परंपरा राबवली. पण सर्वमान्य प्रवाह असा की, संगीताला कथेची जोड देऊन एका बंदिस्त व्यासपीठावरून मर्यादित प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचं श्रेय विष्णुदास भावे यांना जातं. 1843 साली ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग विष्णूदास भावे यांनी सांगली येथे केला. इथे सुरू होतं आज नाटय़संपदा कलामंच या संस्थेने नुकतंच आणलेलं नवीन कोरं करकरीत नाटक ‘चि. सौ. कां. रंगभूमी’.

अनंत पणशीकर आणि यशवंत देवस्थळी निर्मित या नाटकाच्या पहिल्या अंकात मराठी संगीत नाटकांचा आढावा घेतलेला आहे, तर दुसऱया अंकात पद्य नाटकांचा आढावा आहे. त्यामुळे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक मराठी रंगभूमीची वाटचाल दर्शवणारं नाटक आहे असं आपण म्हणू शकतो. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण लेखन करून ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक अधिक रुचकर करण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे. नाटक म्हटल्यावर केवळ इतिहास सांगून चालत नाही, तर त्या इतिहासाची नाटय़पूर्ण गुंफण करावी लागते हे संपदाने जाणून ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीलाच रंगभूमी आणि रसिकराज ही दोन पात्र आणून संपदाने इतिहासाचं नाटक घडवलंय. आता हा मराठी रंगभूमीचा इतिहास या दोघांच्या रिलेशनशिपच्या परिपेक्षातून दाखवण्याचा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा घाट अफाट आहे. असं केल्याने मग मराठी नाटय़सृष्टीचे चढउतार अधिक तीव्रतेने समोर येतात. सिनेमा, रेडियो आणि टीव्ही या माध्यमांचं आगमन आणि त्यांचा रंगभूमीवर होणारा परिणाम दाखवताना मग रसिकराजाच्या आणि रंगभूमीच्या प्रेमकथेतील नाटय़मयता वापरता येते हे संपदाने हुशारीने दाखवलंय. मुळात नाटकाची सुरुवात पडद्याबाहेर सरळ नाटय़गृहात करण्याची युक्ती मस्त आहे. रसिकराजाचं वऱहाड प्रेक्षागृहातून येतं आणि रंगभूमीशी विवाह संपन्न होतो इथे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ नाटक सुरू होतं. साजेसं नेपथ्य वापरून आणि देखाव्यांचा उगीच उहापोह न करता ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ पुढे सरकतं आणि आपण त्यातील निखळ कलेचा आस्वाद घेऊ लागतो.

या कलेचा आस्वाद आपल्याला देतात ते ‘चि. सौ. कां. रंगभूमी’मधले एकूणएक गुणी कलावंत. संगीत रंगभूमी पूर्ण पादाक्रंात करायची म्हटल्यावर कलाकार हे गायक नट आणि तेही उत्तम गायकी असलेले हवेत हे आलंच. इथे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ खऱया अर्थाने जिंकतं. नचिकेत लेले आणि केतकी चैतन्य ही कामगिरी अतिशय सुंदर निभावतात. नचिकेतने सादर केलेले बालगंधर्व खूपच छान जमले आहेत. केतकी चैतन्यने कृतिका उत्तम वठवली आहे आणि दुसऱया अंकात ‘हमिदाबाईची कोठी’मधली सईदा खूप प्रभावीपणे उभी केली आहे. गद्य आणि पद्य दोन्ही सांभाळून केतकीने ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध केलेलं आहे. नारद झालेले अवधूत गांधी असेच दोन्ही पंथात भन्नाट आहेत. शर्वरी कुलकर्णी, रेणुका भिडे, शमिका भिडे आणि अनिरुद्ध देवधर हे आपापली पात्रे व्यवस्थितपणे सांभाळतात. अमोल कुलकर्णी चौरंगी भूमिकेत धमाल करतात. रंगभूमी आणि पु.लं.ची ‘फुलराणी’ म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी संयत अभिनयाचं दर्शन घडवतात. ‘चि. सौ. कां. रंगभूमी’मध्ये आपल्या अभिनयातून रसिकांना मोहीत करतो तो राहुल मेहेंदळे हा हरहुन्नरी अभिनेता. राहुलने ‘नटसम्राट’ कमालीचा सहजपणे पेश केलाय. राहुलने अत्रेंचा लखोबा लोखंडेदेखिल थोडा अधिक सरकॅस्टीक पद्धतीने सुंदर सादर केलाय.   या सर्व कलाकारांसोबतच साथ करणारे ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे यांचं विशेष कौतुक करायला हवं.

‘चि. सौ. कां. रंगभूमी’सारखं कथानक नसलेलं नाटक सादर करायचं तर त्याला सुसूत्रतेची घट्ट वीण असावी लागते. इथे ही वीण पहिल्या अंकात रंगभूमी आणि रसिकराज यांच्या प्रेमळ संवादरूपी निवेदनातून उत्कृष्टपणे येते, नाटकाच्या दुसऱया अंकात जिथे गद्य नाटय़प्रवेश आहेत आणि मुळात प्रेमी जोडपं नाही तिथे हे कठीण होतं. पण संपदाने इथे निवडलेल्या नाटय़प्रवेशांमुळे पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत. संगीत नाटकांतून सामाजिक नाटकांचा प्रवास बाळ कोल्हटकरांच्या कवितात्मक भाषाशैलीपासून पुलंच्या शब्दमहात्म्य सांगणाऱया ‘फुलराणी’च्या मार्गे अत्रे आणि शिरवाडकरांच्या शब्दसामर्थ्यापर्यंत योजून संपदाने मास्टरस्ट्रोक मारलाय. रंगभूमीची अवस्था दाखवण्याचा प्रयत्नही मस्त वाटला. एकूणच अनंत पणशीकर यांनी याआधीच ‘मत्स्यगंधा’ आणि हे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ ही नाटकं आणून मराठी रंगभूमीचं संगीत नाटकांचं वैभवशाली पर्व रसिकांसमोर ठेवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.

नाटक : चि. सौ. कां. रंगभूमी निर्मिती : नाटय़संपदा कलामंच निर्माते : यशवंत देवस्थळी, अनंत पणशीकर संगीत : वर्षा भावे नेपथ्य : सचिन गावकर प्रकाश : शीतल तळपदे लेखिकादिग्दर्शिका : संपदा जोगळेकर-कुलकर्णी कलावंत : केतकी चैतन्य, रेणुका भिडे, शर्वरी कुळकर्णी, शमिका भिडे, नचिकेत लेले, अवधुत गांधी, अमोल कुलकर्णी, अनिरुद्ध देवधर, राहुल मेहेंदळे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी दर्जा : ***