‘वस्त्रहरण’, मनोरंजन Forever!!!

59

>>क्षितिज झारापकर<<

[email protected]

संगीत वस्त्रहरणबाबुजी अर्थात मच्छिंद्र कांबळींचे सदाबहार नाटक. प्रसाद हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.

एखादं नाटक चिरंतन चालू राहू शकतं का आणि तसं घडत असेल तर ते कसं घडत असेल असे अनेक प्रश्न सध्या मला पडू लागले आहेत. कोणतीही कलाकृती यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट खूप गरजेची असते ती म्हणजे कलाकृती तिचा आस्वाद घेणाऱयांच्या पसंतीस उतरली पाहिजे. लोकाभिमुख कलांमध्ये आणि विशेषतः नाटय़, सिनेमाच्या कलाकृतींमध्ये याला ‘ऑडियन्स आयडेंटिफिकेशन’ म्हणतात. प्रेक्षकांना सादर होणाऱया कलाकृतीत स्वतःबाबत काहीतरी सापडायला हवं. मग ती कलाकृती त्यांना भावते आणि आपलीशी वाटते. सिनेमाचं जगच निराळं असतं. तिथल्यापेक्षा नाटय़सृष्टीत हे अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच प्रश्न पडतो की, आचार्य अत्रेंच्या ‘मोरूची मावशी’मध्ये असं काय आहे की, जे ते नाटक 3000 प्रयोग तारू शकलं आणि त्याहीपेक्षा भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाची नेमकी काय किमया आहे की, हे नाटक आजही 5000 प्रयोगांनंतर धडाक्यात चालू आहे?

मराठी नाटक तारलं ते मुख्यतः कोकणी माणसाने. आपापली गावं सोडून कोकणातून चाकरमानी मंडळी गिरण्यांमध्ये मुंबईत स्थिरावली आणि मग त्यांच्या मनोरंजनाच्या भुकेने मराठी नाटक जगू लागलं आणि बहरू लागलं. इथे मनोरंजनाची भूक याचा अर्थ नाटक पाहणे हा नाही, तर नाटक करणे हा आहे. कोकणी माणसं नाटकं करतात ही पारंपरिक बाब आहे. कोकणात नाटक हा प्रत्येक गावाचा वार्षिक उपक्रम असतो आणि यातच ‘वस्त्रहरण’च्या यशाचं गुपित दडलेलं आहे. ‘वस्त्रहरण’मध्ये एक गाव आपलं वार्षिक नाटक सादर करणार असतं आणि त्यात काय काय घडतं हे कथानक आहे. त्यामुळे ‘वस्त्रहरण’ला नाटक म्हणणंच चुकीचं आहे. ‘वस्त्रहरण’ हा मुंबईपासून गोव्यापर्यंत एका बाजूला सह्याद्री आणि दुसऱया बाजूला अरबी समुद्र असलेल्या कोकण पट्टीला दाखवलेला आरसा आहे.

मच्छिंद्र कांबळी यांनी कोकणी माणसाचं नाटय़प्रेम ओळखलं आणि या बोलीभाषेची नाटकं मुख्य मराठी रंगभूमीवर आणून एक नीश मार्केटिंगचं मोठ्ठं उदाहरण आपल्याला दिलं. ‘चाकरमानी’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘घास रे रामा’, ‘केला तुका आणि झाला माका’, ‘येवा कोकण आपलाच असा’ अशी एकाहून एक हिट नाटकं मच्छिंद्र काबळी यांनी मालवणी भाषेतून मराठी रंगभूमीला दिली, पण त्यांचा अजरामर झालेला बेरकी तात्या सरपंच म्हणजे त्यांच्या ‘वस्त्रहरण’ची शान आहे. आजही मच्छिंद्र कांबळी हे नाव आलं की, तात्या सरपंच डोळ्यांपुढे उभा राहतो. त्यांच्या पश्चात भद्रकालीची धुरा प्रसाद कांबळी यांनी अत्यंत समर्थपणे वाहिली. आज ‘देवबाभळी’सारखं जागतिक स्तरावर दखलपात्र नाटक प्रसादने भद्रकालीच्या बॅनरवर आणलं आहे. तरीही आपल्या वडिलांची ओळख आणि भद्रकालीच्या पेचातला मानाचा तुरा तो सदैव लक्षात ठेवून आहे. ‘वस्त्रहरण’ हा तुरा तो जिवंत ठेवतो आणि हे नाटक जेव्हा जेव्हा पुन्हा उभं राहतं तेव्हा ते कमाल करून दाखवतं.

‘वस्त्रहरण’ कधीही करायचं म्हटलं की, अवघी इंडस्ट्री वेळात वेळ काढून ते साकारायला उत्सुक असते. यंदाही तेच झालंय. सगळे दिग्गज कलावंत ‘वस्त्रहरण’ करायला उभे ठाकलेत. स्वतः एक समर्थ लेखक दिग्दर्शक असलेल्या देवेंद्र पेमपासून ते मराठी ‘बिग बॉस’मध्ये गाजलेल्या किशोर चौघुले आणि रेशम टिपणीसपर्यंत सगळे. यात पेम यांचे दोन सुपुत्र आहेत. अंशुमन विचारे, प्रणव रावराणे, किशोरी अंबिये, शशिकांत केरकर, समीर चौघुले ही आणि आणखी बरीच मंडळी आहेत. हे सगळे समर्थपणे ‘वस्त्रहरण’ करतात, पण हे नाटक कधीही कुणीही करायचं म्हटलं की, रसिकांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो तात्या सरपंच कोण? या ‘वस्त्रहरण’मध्ये दिगंबर नाईक याने तात्यामध्ये जीव ओतलाय. दिगंबरचा तात्या इरसाल, बेरकी आणि तरीही प्रेमळ असा फर्मास उभा राहिलाय. बऱयाचदा सीनियर कांबळींची आठवण करून देत दिगंबर नाईकचा तात्या आपल्याला आनंद देतो. हे काम कठीण आहे, पण नाईकांनी ते व्यवस्थित पेललंय. ‘वस्त्रहरण’च्या बाबतीत दुसरा प्रश्न येतो तो तालीम मास्तर कोण? इथे मात्र प्रसाद कांबळींनी खराखुरा तालीम मास्तर आणलाय. मंगेश कदम याही संचात ती भूमिका करतात, पण खरं तर मंगेश भूमिका करतच नाही. ‘वस्त्रहरण’च्या पहिल्या संचापासून मंगेश कदम ‘वस्त्रहरण’शी जुळलेले आहेत. हे नाटक त्याचं सेकंड नेचर झालेलं आहे. आज ‘वस्त्रहरण’ हे मंगेशने उभं (दिग्दर्शित) केलंय, पण ते याला श्रेयनामावलीत नाव तालीम मास्तर म्हणूनच देतात. याला आस्था म्हणतात.

प्रसाद कांबळी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून मराठी नाटक मोठं व्हायला हवं ही आवई उठली आहे. ‘वस्त्रहरण’ हे केवळ एक लेव्हल, एक रंगीत पडदा आणि दोन दोऱयांच्या मदतीने एक भव्य नाटक कसं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘वस्त्रहरण’ वरवर फ्री फॉर्मचं नाटक वाटतं, पण ते खरं तर प्रचंड शिस्तबद्ध नाटक आहे. प्रत्येक पात्राने आपल्यापुरती शिस्त बाळगून काम करणं हे या नाटकाच्या यशाचं गणित आहे. इथे सगळे मातब्बर कलाकार असूनही त्यांनी ही शिस्त पाळलेली आहे. म्हणूनच आजही ‘वस्त्रहरण’ तितकंच ताजं आहे. 5000 प्रयोगांनंतरही हा तजेला कायम राहिला ही गंगाराम गवाणकरांच्या लेखणीचीच पुण्याई आहे. त्यांनी लीलया एक परफॉर्मन्स बेस्ड नाटक चाळीस वर्षांपूर्वी लिहिलं आणि आजही त्याची किमया कायम आहे.

‘वस्त्रहरण’ हे लंडनला जाणारं पहिलं मराठी नाटक होतं. एकंदरीत प्रसाद कांबळी निर्मित भद्रकालीचं आजचं ‘वस्त्रहरण’ पाहून असं वाटतं की, मच्छिंद्र कांबळी सर वूड बी प्राऊड ऑफ धिस ‘वस्त्रहरण’.

नाटक  : वस्त्रहरण निर्मिती  : भद्रकाली प्रॉडक्शन लेखक : गंगाराम गवाणकर निर्माते : कविता मच्छिंद्र कांबळी तालीम मास्तर  :  मंगेश कदम रंगभूषा  : सचिन खारीक, चंदर पाटील कलाकार : मंगेश कदम, रेशम टिपणीस, अंशुमन विचारे, किशोर चौघुले, किशोरी अंबिये, समीर चौघुले, देवेंद्र पेम, प्रदीप पटवर्धन, प्रभाकर मोरे, प्रणव रावराणे, मुकेश जाधव, मनमीत पेम, गोटय़ा सावंत, मयुरेश पेम, शशिकांत केरकर, सचिन सुरेश आणि दिगंबर नाईक दर्जा  : ***

आपली प्रतिक्रिया द्या