
सामना प्रतिनिधी। कुडाळ
स्वातंत्र्यदिनी पिंगुळी ग्रामपंचायतच्या सरपंच निर्मला पालकर – मोर्ये यांना उपसरपंचांनी ध्वजारोहणापासून वंचित ठेवले. महिला लोकप्रतिनिधीस झेंडावंदन प्रक्रियेपासून वंचित ठेवून देशाच्या घटनेने ठरविलेल्या संहितेस बाधा निर्माण करण्याचे काम उपसरपंचांनी केल्याने कलम 39 अन्वये त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी कुडाळ तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह अन्य संबंधितांकडे निवेदनाद्धारे केली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चौकशीत उपसरपंच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कलम 39 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले आहेत.
15 ऑगस्ट रोजी आपणांस ध्वजारोहणापासून उपसरपंचांनी वंचित ठेवल्याची तक्रार पिंगुळीच्या सरपंच पालकर यांनी सरपंच सेवा संघाकडे करून आपणांस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर सेवा संघाने तातडीची बैठक घेतली. नंतर तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन सादर देण्यात आले.
या निवेदनात पिंगुळी सरपंच म्हणून निर्मला पालकर कार्यरत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनाचा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे. 1 जानेवारी 2003 च्या शासन निर्णयामध्ये ध्वज संहितेबाबत उल्लेख केलेला असून या ध्वजसंहितेचा पिंगुळी ग्रामपंचायत ध्वजारोहणावेळी भंग केलेला आहे. झेंडावंदन करण्याचा महिला सरपंचांचा अधिकार डावलून त्यांना झेंडावंदनापासून वंचित ठेवून घटनेच्या संहितेस बाधा निर्माण करण्याचे काम पिंगुळी उपसरपंच यांनी केले आहे. उपसरपंच यांनी स्वतः ध्वजारोहण करून अवमान केलेला आहे. या घटनेस ते सर्वस्वी जबाबदार असल्याने कलम 39 अन्वये त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
summary…kudal.-kudal-sarpanch-not-allowed-to-hoist-flag






























































