कार्यक्रमाचं नाव ‘शासन आपल्या दारी’, मुख्यमंत्र्यांची वाट पाहून नागरिक परतले घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी गेलेल्या नागरिकांनी परतीची वाट धरल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं. कारण ठरलं ते प्रचंड गरमी आणि नियोजित वेळ उलटूनही मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती. मुख्यमंत्र्यांची नियोजित वेळ दुपारी बाराची होती मात्र एक वाजला तरी मुख्यमंत्री न आल्याने तसेच गरमीला कंटाळलेल्या नागरीकांनी मंडपातून बाहेर पडत परतीची वाट धरली. बैठक व्यवस्थाही अपुरी केल्याने अनेक महिलांना खाली जमिनीवर बसावे लागले. मंडपात पुरेसे पंखे नसल्याने भर दुपारच्या गरमीने अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत होत्या. त्यामुळे रुमाल व टोप्यांच्या सहाय्याने हवा घालत लोकांनी घामाच्या धारांना शांत करत होते.

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत सोमवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मंडप उभारण्यात आला असून शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल्स देखील लावण्यात आले आहेत. मंगळवारी या कार्यक्रमासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली. मात्र, 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वेळ होती. परंतु 1 वाजून गेले तरी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमस्थळी पत्ताच नसल्याने अनेक नागरिकांनी घरची वाट धरल्याचं पाहायला मिळालं.

भर उन्हात लावलेले स्टॉल आणि चार तासांहून अधिक काळ वाट पाहायला लागल्यामुळे नागरिक कंटाळल्याचं यावेळी दिसून आलं. तब्बल दीड तासांनी मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आला असला तरी पुरेसे पंखे नसल्याने भर दुपारी गरमी वाढली. गरमीच्या त्रासाला लोकांना सामोरे जावे लागले. मंडपाच्या बाहेर प्रचंड उन्हात बरेच लोक उभे होते. विविध योजनांचे स्टॉल मंडपाबाहेर लावण्यात आले होते. परंतु भर उन्हात या स्टॉलवर लोकांना भेट द्यावी लागली. लाभार्थींसाठी दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती परंतु, अनेकांना जेवणच मिळाले नाही, असं चित्र दिसून आलं.

या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी कुडाळ येथील कार्यक्रम स्थळी दाखल झाले. सर्वांनी मोबाईल बॅटरी पेटवून स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. मात्र, उन्हाने आधीच वैतागलेले उपस्थित नागरिक त्यांच्या भाषणाला न थांबता थेट मंडपाबाहेर पडले.