कुडाळात खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक

सामना प्रतिनिधी। कुडाळ

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून न.पं.तील सत्ताधारी व विरोधक सोमवारी पं.स.जवळ भर रस्त्यात आमने-सामने आले. सत्ताधारी स्वखर्चाने करत असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शिवसेनेने करीत या कामाचा पोलखोल केला. दरम्यान स्वाभिमानचे सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक व विरोधी शिवसेना नगरसेवकांमध्ये भररस्त्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली.

न.पं.च्या ताब्यात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने दुर्दशा झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये मोटरसायकल घसरून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहनधारकांसह पादचार्‍यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. न.पं.ने खड्डे बुजवण्याची मोहीमही अर्ध्यावरच टाकल्याने रस्त्याची पुरती दैनावस्था झाली आहे. त्यातच सोमवारी सत्ताधारी मंडळींनी स्वखर्चातुन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. कुडाळ पं.स समोरील खड्डे सकाळी जांभा दगड व ग्रीट टाकूण बुजविले जात होते.

शिवसेनेने या कामाला आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करीत काम रोखले. लागलीच सत्ताधारी नगरध्यक्षांसह नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचे जि.प.सदस्य संजय पडते, सभापती राजन जाधव, न.पं.चे गटनेते बाळा वेंगुर्लेकर, नगरसेवक गणेश भोगटे यांच्यासह रिक्षा संघटनेचे अविनाश पाटील आदींनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधार्‍यांना जाब विचारला.

सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक हमरीतुमरी झाली. नगराध्यक्ष राणे , बांधकाम सभापती ओंकार तेली, राकेश कांदे आदींनी सामंजस्याची भुमिका घेत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी नगरसेवक स्वखर्चातुन हे काम करीत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगुन रोलर फिरवून काम करू असे सांगितले. त्यावर शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे व बाळा वेंगुर्लेकर यांनी सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करू नका. जनतेच्या रोषाला सर्व नगरसेवकांना सामोरे जावे लागत असुन न.पं.चा निधी खर्च करून जनतेला चांगल्या दर्जाचे काम करून दिलासा द्या अशी भुमिका मांडली. नगराध्यक्ष राणेंसह सत्ताधारी नगरसेवकांनी गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असे सांगितले यावेळी रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.