
वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये अद्यापही अशांतता असून कुकी समाजाच्या नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे. राज्यातील इनर मणिपूर आणि आउटर मणिपूर या लोकसभेच्या दोन जागांसाठी 19 व 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
मणिपूरमध्ये वर्षभरापासून कुकी आणि मैतेई या समाजांत संघर्ष सुरू आहे. शेकडो जण विस्थापित झाले आहेत. या विस्थापितांसाठी मदत छावण्यांमध्येच मतदान केंद्रे उभारण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र येथील वांशिक हिंसाचाराचा परिणाम आता लोकसभा निवडणुकीवरही दिसू लागला आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र बहिष्कार घातल्यामुळे कुकी समाजातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
– 2022मध्ये स्थापन झालेल्या कुकी पीपल्स अलायन्स पक्षानेही लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस लालम हँगशिंग म्हणाले की, आम्हाला कोणत्याही मोठय़ा पक्षाचा पाठिंबा नाही. तसेच आमची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
























































