
कश्मीर खोऱयात दहशतवाद्यांनी प्रचंड हैदोस घातला आहे. कश्मिरी पंडित शिक्षिकेच्या हत्येला 72 तास उलटत नाही तोच गुरुवारी पुन्हा ‘टार्गेट किलिंग’ घडले. दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये बँकेत घुसून मॅनेजरची गोळय़ा झाडून हत्या केली. हा मॅनेजर मूळचा राजस्थानच्या हनुमानगडचा रहिवासी होता. तो बिगरकश्मिरी असल्याने त्याला टार्गेट केले. कश्मीर फ्रीडम फायटर्स (केकेएफ) या दहशतवादी संघटनेने मॅनेजरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून खोऱयातील बिगरकश्मिरींना एका पत्रातून धमकी दिली आहे. दहशतवादी एवढय़ावरच थांबले नाही तर त्यांनी नंतर चदूरा येथील दोन परप्रांतीय वीटभट्टी कामगारांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळी कुलगाम जिह्यातील मोहनपोरा येथील इलाकाई देहाती बँकेच्या शाखेत दहशतवादी घुसला आणि त्याने बँक मॅनेजर विजय कुमार यांच्यावर गोळय़ा झाडल्या. त्यात गंभीर रक्तस्राव होऊन कुमार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन सुरू केले, मात्र हल्लेखोर अजून हाती लागलेला नाही. विजय कुमार यांची अलीकडेच कुलगाममध्ये नेमणूक झाली होती. हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. दहशतवाद्याने गोळी झाडून बँकेतून पळ काढल्याचे त्यात दिसत आहे. बुधवारी सायंकाळी शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकावर घरात घुसून गोळय़ा झाडल्या होत्या. त्यात तो नागरिक गंभीर जखमी झाला आहे. लागोपाठ घडलेल्या गोळीबाराच्या घटनांनी कश्मीर खोरे प्रचंड धगधगले आहे.
अमित शहांनी दिल्लीत बोलावली तातडीची बैठक
‘टार्गेट किलिंग’चे सत्र पुन्हा सुरू झाल्यामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी तातडीने राजधानी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि ‘रॉ’चे प्रमुख सामंता गोयल यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हेदेखील उपस्थित होते. गृहमंत्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारीही बैठक होणार आहे. कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हेही बैठकीला हजर राहतील.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर निशाणा
बँक मॅनेजरच्या हत्येच्या घटनेचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ‘राजस्थानचे रहिवासी विजय कुमार यांची दहशतवाद्यांकडून झालेली हत्या अत्यंत निंदनीय आहे,’ असे ट्विट करीत गेहलोत यांनी पेंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. एनडीए सरकार कश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. आमच्या नागरिकांची दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे होणारी हत्या आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्राला दिला आहे.
‘मोदींच्या भरवशावर राहाल तर ‘बळी’ पडाल!
दहशतवादी संघटना ‘केकेएफ’ने कश्मीरच्या लोकसंख्यानिहाय बदलामध्ये सामील होणाऱया बिगरकश्मिरींना धमकावले आहे. जे बिगरकश्मिरी लोक कश्मीरात स्थायी नागरिकत्व मिळवण्यासाठी मोदी सरकारच्या भरवशावर असतील त्यांनी डोळे उघडावेत. तुम्हाला यासाठी जीव गमवावा लागेल, हे लक्षात ठेवा. विचार करण्यात वेळ घालवू नका, अन्यथा पुढची पाळी तुमची असेल, अशी धमकी ‘केकेएफ’ने दिली.




























































