
कुलगाममध्ये ‘टार्गेट किलिंग’चा बळी ठरलेला बँक मॅनेजर विजयकुमार बेनीवालचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. विशेष म्हणजे, त्याच्या लग्नाचा अल्बमही आला नव्हता. मोठय़ा थाटामाटात लग्न झालेले, पण स्वतःच्या लग्नसोहळय़ात कॅमेऱयात टिपलेले आनंदाचे क्षण पाहण्याची विजयकुमारची इच्छा अधुरीच राहिली. राजस्थानातून कश्मीरमध्ये नियुक्ती होऊन काही महिने उलटत नाही तोच त्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
मूळचा राजस्थानच्या हनुमानगढ जिह्यातील रहिवासी असलेला 26 वर्षीय विजयकुमार याला गुरुवारी कुलगाम जिह्यात दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून ठार केले. विजयकुमारचे वडील ओमप्रकाश बेनिवाल हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ‘मी आदल्या रात्री विजयशी बोललो. दुसऱया दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी 11 वाजता नाश्ता करीत असताना कोणीतरी मला हाक मारली. विजयकुमारवर गोळी झाडल्याची बातमी टीव्हीवर चालू असल्याचे सांगितले. टीव्हीवरची बातमी ऐकून मला धक्काच बसला. कारण आमचा विजय ‘टार्गेट किलिंग’चा बळी ठरला होता. विजयकुमारचे 10 फेब्रुवारीला लग्न झाले आणि 10 दिवसांनीच नोकरीवर रुजू होण्यासाठी तो निघून गेला. नुकताच तो त्याच्या पत्नीलाही सोबत घेऊन गेला होता. या फेरीत आम्हालाही येण्यास सांगितले होते, परंतु पर्यटकांच्या गर्दीमुळे आम्ही पुढच्या वेळी येऊ, असा शब्द दिला होता. विजयकुमारच्या मृत्यूमुळे आता सर्वकाही संपले’, अशी उद्विग्न भावना विजयकुमारचे वडील ओमप्रकाश यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

























































