कुमारस्वामी रडले! मी ‘आघाडी’ सरकारमध्ये ‘विष’ पचवतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बंगळुरू

तुम्हाला वाटत असेल आपला अण्णा मुख्यमंत्री बनला आहे. पण माझे दुःख कोणाला सांगून हलके न करता मी ‘हलाहल’ पचवत आहे. बहुमत नसलेल्या सरकारचा प्रमुख बनण्याचा मला बिलकुल आनंद नाही, असे सांगताना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. कर्नाटकात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल जनता दल (सेक्युलर) तर्फे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी पुष्पगुच्छ आणि हारतुरे स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. ‘आघाडी’चे सरकार चालवताना मला अक्षरशः विष पचवावे लागत आहे, अशा शब्दांत आपली हतबलता सांगताना कुमारस्वामी भावुक झाले.

निवडणूक प्रचाराच्या काळात आपण जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी आपल्या सभांना मोठी गर्दी केली होती. पण मतदान करताना मात्र त्याच लोकांना माझा आणि माझ्या पक्षाचा साफ विसर पडला, असे सुनावत मुख्यमंत्र्यांनी जनतेबद्दलही नाराजी व्यक्त केली. राज्यातील जनतेची सेवा करण्याच्या एकमेव उद्देशाने आपण मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगली होती. त्या पलीकडे आपला कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कर आकारला तर लगेच माझ्यावर टीका सुरू होते. मी दिलेल्या कर्जमाफीच्या योजनेत स्पष्टता नाही, अशी बोंब मीडिया मारते. हे पाहून दोन तासांत मुख्यमंत्रीपद सोडून द्यावे, असे मनात येते. – एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

२५०० कोटी आणू कुठून?
अन्न भाग्य योजनेखाली पाच किलो तांदळाऐवजी सात किलो तांदूळ द्यावेत, अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यासाठी २५०० कोटी आणू कुठून, असा सवाल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी मला महिनाभर अधिकाऱ्यांना विनवण्या कराव्या लागल्या असे त्यांनी सांगितले.

रडता काय? हिमतीने परिस्थितीला सामोरे जा – काँग्रेस
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जनतेसमोर रडता कामा नये. त्यांनी हिमतीने परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. तर काँग्रेसचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कायम आनंदीच असले पाहिजे. ते आनंदी राहिले तरच आम्ही सारे आनंदी राहू.