कुर्ल्यातील त्या बेपत्ता मुलीचा त्याच दिवशी अपघाती मृत्यू, 10 महिन्यांनंतर उकलले गूढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-zero-accident

गेल्या मार्च महिन्यात कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतील बेपत्ता झालेल्या मुलीचे नेमके काय झाले ते आता स्पष्ट झाले आहे. ज्या दिवशी ती मुलगी बेपत्ता झाली होती त्याच दिवशी तिचा अपघाती मृत्यू झाला होता. तब्बल 10 महिन्यांनंतर गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने त्या 17 वर्षीय मुलीची माहिती शोधून काढली आहे.

गेल्या वर्षी 30 मार्च रोजी आरती रितादिया ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्याच दिवशी तिच्या पालकांनी नेहरूनगर पोलिसांत मुलगी हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, त्याच दिवशी चेंबूर आणि टिळकनगर रेल्वे स्थानकांदरम्यान आरतीचा अपघाती मृत्यू झाला होता. वडाळा रेल्वे पोलिसांनी आरतीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शीव रुग्णालयात पाठवला. त्यावेळी आरतीची ओळख पटेल असे काहीच पोलिसांना मिळून आले नाही. त्यामुळे तिचा मृतदेह बेवारस म्हणूनच पडून होता. पण नेहरूनगर पोलिसांना आरतीचा शोध लागत नव्हता. त्यामुळे पोलीस तपासावर नाराज असलेल्या आरतीचे वडील पंचाराम यांनी 13 ऑक्टोबर रोजी टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या केली. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळले. नेहरूनगर पोलिसांच्या चुकीच्या व बेजबाबदार कारभारामुळे मुलीचा शोध लागत नाही. तसेच पंचाराम हेदेखील त्याचाच बळी असल्याचा आरोप करीत ठक्कर बाप्पा कॉलनीतील संतप्त जमावाने चेंबूरमध्ये 22 ऑक्टोबरला अंत्ययात्रा काढली. त्यावेळी जमाव प्रक्षोभक झाला आणि त्यांनी एका वरिष्ठ निरीक्षकांवर हल्ला चढवला होता.

…तर पुढचे प्रकरण घडलेच नसते
नेहरूनगर पोलिसांनी सात महिने योग्य तपास केला नाही, पण गुन्हे शाखेने दोन महिन्यांत आरतीचा शोध लावला असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. नेहरूनगर पोलिसांनी तेव्हाच असा शोध केला असता तर पंचाराम यांचे प्राण वाचले असते. संतप्त जमावाचा मोर्चा निघाला नसता आणि पोलीस अधिकाऱयावर हल्ला झाला नसता असे ठक्कर बाप्पा कॉलनीतील नागरिकांचे म्हणणे आहे.