मुद्दाम आम्हाला इराणच्या तोंडी दिले…; कुवेत हल्ल्यातून बचावलेल्या अमेरिकी सैनिकांनी दिली मोठी माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल- इराण युद्धादरम्यान कुवेतमधील एका अमेरिकी लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, एका ‘स्कर्टर’ ड्रोनने कुवेत येथील एका तटबंदीयुक्त तळाची सुरक्षा भेदली होती. तथापि, या हल्ल्यातून बचावलेल्या सैनिकांनी हा दावा सपशेल खोटा असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या लष्करी तळावरील हा हल्ला २०२१ नंतर अमेरिकी सैन्यावर झालेला सर्वात प्राणघातक हल्ला होता. सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सैनिकांनी दावा केला की, हा हल्ला टाळता आला असता आणि त्यांना मुद्दामहून धोक्यात टाकत इराणच्या तोंडी देण्यात आले होते. हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तळावर प्रत्यक्षात कोणतीही संरक्षक उपकरणे नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कुवेतमधील एका अमेरिकी लष्करी तळावर झालेल्या प्राणघातक ड्रोन हल्ल्यात सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी तेथ कडेकोट सुरक्षा असल्याचा दावा केला असूनही, तळावरील सुरक्षेच्या अभावामुळे हा हल्ला थांबवता आला नाही, असा दावा सैनिकांनी केला आहे.

अमेरिकेच्या दाव्यांबाबत एक जखमी सैनिक म्हणाला, ड्रोनने सुरक्षा कवच भेदले असे म्हणणे खोटेपणाचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या तुकडीकडे आत्मसंरक्षणाचे कोणतेही साधन नव्हते. तो एक तटबंदीयुक्त लष्करी तळ नव्हते, तर एक जुना लष्करी तळ होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

युद्ध सुरू होण्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने कुवेतमध्ये तैनात असलेल्या बहुतेक सैनिकांना जॉर्डन आणि सौदी अरेबियामध्ये हलवले होते, कारण तो भाग इराणी क्षेपणास्त्रांच्या टप्प्याबाहेर होते. मात्र, या ६० जवानांना मुद्दाम इराणजवळच्या शुऐबा बंदराजवळील एका लहान लष्करी चौकीवर पाठवण्यात आले होते. शस्त्रे आणि उपकरणांच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन करणे हे त्यांचे काम होते. एका सैनिकाने सांगितले, आम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय इराणजवळच्या एका असुरक्षित भागात पाठवण्यात आले, जो आधीच एक इराणकडून लक्ष्य ठरवण्यात आला होता. आम्हाला मुद्दाम इराणच्या तोंडी देण्यात आले होते.

सैनिकांनी स्पष्ट केले की, ज्या सामरिक कार्यसंचालन केंद्रात ते तैनात होते, ते केंद्र खूप आधी बांधले गेले होते. तिथे फक्त काँक्रीटचे अडथळे होते जे रॉकेट आणि मोर्टार रोखू शकत होते, परंतु ते वरून होणाऱ्या हल्ल्यांपुढे निरुपयोगी होते. एका सैनिकाने स्पष्ट केले की, तिथे फक्त काही छोटे अडथळे आणि कार्यालये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पत्र्याच्या लहान इमारती होत्या. बंकर हा सर्वात असुरक्षित भाग होता. त्या सैनिकाने दावा केला की, हा तळ इराणसाठी लक्ष्य असू शकतो याची अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला आधीच माहिती होती.

२ मार्च रोजी, कुवेत येथील एका अमेरिकन तळावर सायरन वाजला, ज्यामुळे सैनिकांनी काँक्रीटच्या बंकरमध्ये आश्रय घेतला. एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डोक्यावरून गेल्याने, सर्व काही ठीक आहे, असा इशारा देण्यात आला आणि सैनिक आपापल्या जागी परतले. पण सुमारे 30 मिनिटांनंतर, जमीन अचानक हादरली आणि तळाच्या अगदी मध्यभागी एका इराणी ‘शाहिद’ ड्रोनचा स्फोट झाला. या हल्ल्यात सहा सैनिक ठार झाले आणि २० जण जखमी झाले. एका सैनिकाने वर्णन केले, सर्व काही एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते. माझ्या कानात आवाज घुमत होता, दृष्टी धूसर झाली होती आणि सर्वत्र धूळ पसरली होती. त्यामुळे अमेरिकेने केलेला दावा त्यांच्याच सैनिकांनी खोडू काढला आहे.