
रत्नागिरीतील कुवारबाव येथे 23 गृहनिर्माण संस्था असून जवळपास 750 निवासी भूखंड आहेत. सर्व गृहनिर्माण संस्थांच्या स्थापनेपासून आजपर्यंत सुमारे 45 वर्षांत जमिनीचा सातबारा एकत्रित असून त्यावर सभासद भूखंडधारकाचे नाव नव्हते. भगवती गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने सन्मानीय 2022 सालापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आवश्यक ते सर्व पुरावे शोधून प्रशासनाला राहून गेलेल्या त्रुटी लक्षात आणून दिल्या.
शैलेंद्र चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची योग्य ती दखल घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी रेखांकन आदेशानुसार झालेल्या आकार फोड पत्रकाप्रमाणे वैयक्तिक सातबारा नोंद करण्याचे आदेश दिले. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात भगवती गृहनिर्माण संस्थेच्या 27 सभासदांना वैयक्तिक प्रमाणे सातबारा वाटप करण्यात आले.
या कामासाठी अप्पर जिल्हाधिकारी गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे व इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

























































