लडाखमधील टेन्शन दूर होणार; आधी रणगाडे मागे घेणार, मग सैन्य; हिंदुस्थान-चीनचा तीन कलमी तोडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान – चीन सीमारेषेवर सुरु असलेले टेन्शन अखेर दूर होणार आहे. यासाठी दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी यावर तीन कलमी तोडगा काढला असून त्यानुसार दोन्ही देशांनी माघार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात रणगाडे व इतर सैन्य वाहने मागे घेतली जाणार असून त्यानंतर सलग तीन दिवस 30 टक्के सैन्य मागे घेतले जाणार आहे. तर अंतिम टप्प्यात पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरुन सैन्य मागे घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

हिंदुस्थान आणि चीनच्या सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चुशूलमध्ये 6 नोव्हेंबरला आठ कॉर्प्स कमांडर स्तराची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली असून त्यानंतर हा तीन कलमी तोडगा निश्चित करण्यात आला आहे.

  • पहिल्या टप्प्यात आधी सैन्य रणगाडे व सैन्य वाहने मागे घेणार आहेत. नियत्रंण रेषेपासून एका ठराविक अंतरापर्यंत दोन्ही देश आपले रणगाडे आणि सैन्य वाहने माग घेणार आहेत.
  • दुसऱ्या टप्प्यात पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावरुन सलग तीन दिवस 30 टक्क्यांपर्यंत सैन्य मागे घेतले जाणार आहे. धन सिंह थापा पोस्टपर्यंत हिंदुस्थानी सैन्य मागे घेतले जाणार असून चिनी सैन्य फिंगर आठ या त्यांच्या मूळ जागेपर्यंत परत जाणार आहे.
  • तिसऱ्या आणि अंतिम टप्पात पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरुन दोन्ही देशांचे सैनिक माघारी फिरणार आहेत. वैमानिकरहित विमानाच्या माध्यमातून या माघारीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे.