पैसे थकवल्याने लाडक्या बहिणींचा राडा; थेट बालविकास केंद्रात धडक, जोरदार घोषणाबाजी

Ladki Bahin Yojana Angry Protest as Payments Delayed for Thousands

राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रूटींमुळे जिह्यात आज तीव्र असंतोष उफाळून आला. मागील अनेक महिने उलटूनही आणि सर्व आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेकडो महिलांनी थेट महिला व बाल विकास कल्याण कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन केले. ‘आमचे पैसे कुठे तात्काळ द्या, आदी घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी जिह्यातील 10 लाख 50 हजार महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र प्रशासकीय व तांत्रिक अडथळ्य़ांमुळे 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. अनेक महिलांनी बँका, सेतू कार्यालये आणि संबंधित विभागांचे उंबरठे झिजवले असून, वारंवार केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

आधार कार्ड व बँक खात्यावरील नावातील तफावत, आधार–बँक लिंक नसणे, आधार सीडिंगमधील तांत्रिक चुका यांमुळे निधी वर्ग करण्यात अडचणी येत आहेत. लवकरात लवकर सर्क त्रूटी दूर करून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

Ladki Bahin Yojana: Angry Protest as Payments Delayed for Thousands

Hundreds of women protested at the Women and Child Development office over delayed payments of the Ladki Bahin Yojana. Technical errors leave 1 lakh women without benefits.