लाडक्या बहिणींचा सरकारच्या डोक्याला ताप, निधी वेळेवर मिळत नाही; कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची जाहीर कबुली

लाडकी बहीण योजनेमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारसाठी ही योजना आता डोकेदुखी ठरू लागली आहे. या योजनेमुळे विकास निधी मिळण्यास विलंब होत असल्याची जाहीर कबुली कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

इंदापूर तालुक्याला सर्वाधिक विकास निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब होतो असे भरणे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, दत्ता भरणे माझे सहकारी आहेत, त्यांना नेमका कोणता निधी मिळाला नाही आणि ते कोणत्या अर्थाने म्हणाले ते मी विचारतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तिजोरीवर शंभर टक्के ताण पडतोय – भुजबळ

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर शंभर टक्के ताण पडतोय, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. लाडक्या बहिणींसाठी शिल्लक पडलेला निधी सरकारकडे नव्हता. ही योजना असो वा शिव भोजन थाळी योजना असो तिजोरीत खडखडाट असल्याने त्या योजनांना पैसे मिळण्यास उशीर होत आहे आणि लाडकी बहीण, शिव भोजन थाळी याच्यादेखील पैशांना उशीर होत आहे. राज्याची आर्थिक घडी नीट बसत नाही तोपर्यंत हे होणार, असे ते म्हणाले.