राजस्थान ते रत्नागिरी!! नव्या स्वप्नातून ‘ती’ जागवतेय मनोरुग्णांच्या आकांक्षा

683

काही कारणास्तव मनावर होणारा खोलवर परिणाम जर योग्यवेळी सावरता आला नाही तर माणसाची अवस्था भ्रमिष्टासारखी होते. मनावर होणारे आघात प्रत्येक व्यक्तीला झेलता येतातच असे नाही. मन कमकुवत आणि अधिक भावनाप्रधान असलं तर विश्वासघात अथवा फसवणूक यासारख्या प्रकारांमुळे चांगल्या व्यक्तीच्या नशीबी मनोरुग्ण बनून राहण्याची दुर्दैवी वेळ येते. मनोरूग्ण म्हटला की, त्यांच्याबद्दल मनात एक भीती निर्माण झालेली असते. त्याच्यापासून दूर राहणेच चांगले, अशा समजातून अनेकजण त्यांना टाळतात. मग त्यांची सेवा करणे तर खूप दूरची गोष्ट असते. मात्र अशा मंडळींसाठी देखील आपलेपणाने धडपडणारे काही हात असतात. खरंतर अशा असामान्य व्यक्तींमुळे समाजात मानवतेचा तोल साधण्याचे काम होत असते. समाजकार्याची तळमळ असलेल्या आणि राजस्थानातून शेकडो किमी दूर रत्नागिरीत येऊन रहात असलेल्या 24 वर्षीय आकांक्षा सिंह राघव मनोरुग्णांची माऊली बनून त्यांची काळजी घेत आहे.

जीवनात काहीतरी वेगळं करायचे असा निर्धार आकांक्षाने बालपणीच केला होता. वेगळी वाट निवडतांना आणि या वाटेवरुन चालतांना अनेक अडचणी येतात, अशा अडचणी आपल्यालाही आल्या मात्र हार न मानता यावर मात करत मी पुढे गेल्याचे आकांक्षाने नमूद केले. बालपणापासूनच आपल्याला समाजकार्याची आवड होती. निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करायचे या निर्धाराला उच्च शिक्षणानंतर मूर्त स्वरुप देण्याचा निश्चय आकांक्षाने केला होता. बालपणी शाळेत जातांना रस्त्यावरून फिरणाऱ्या मनोरुग्णांकडे पाहून मन हेलावून जायचे. यांच्या जवळचे असे कोणीच कसे नाही, असा प्रश्न आकांक्षाला सतावत राहायचा.

राजस्थान येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने डेहराडून येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय जीवनापासून समाजकार्याची आवड निर्माण झाल्याने तिने समाजशास्त्र या विषयातच उच्च शिक्षण पूर्ण केले. आपल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून चेन्नईत सामाजिक कार्य करणार्‍या ‘द बॅनियन’ संस्थेत ती दाखल झाली. गेली 36 वर्षे ही संस्था मनोरुग्णांना आधार देत आहे. गतवर्षी मे महिन्यात या संस्थेने महाराष्ट्रातही आपला कार्यारंभ केला असून, रत्नागिरीतूनच याची सुरुवात केली आहे.

या संस्थेमार्फत रत्नागिरीत ‘होम अगेन’ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून निराधार महिला मनोरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना मायेचा आधार देण्यात येत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील ज्या महिला रुग्णांचे नातेवाईक नाहीत किंवा ज्यांचा पत्ता सापडत नाही अशा 15 महिला मनोरुग्णांना त्यांनी गतवर्षी ऑगस्ट महिन्यात दत्तक घेतले आहे. तालुक्यातील जांभूळफाटा, शिवाजीनगर आणि चर्मालय येथे भाड्याने घरे घेऊन प्रत्येकी पाच याप्रमाणे या रुग्णांना तेथे ठेवण्यात आले आहे. अगदी 25 वर्षांपासून ते 1 वर्षांपर्यंत रुग्णालयात राहिलेल्या महिला रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. मनोरुग्ण असले तरी त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत आहेत. यांचा दिनक्रम ठरलेला असून, सकाळी मॉर्निंग वॉक, नियोजित वेळेत औषधे, जेवण, सायंकाळचा फेरफटका याचे काटेकोरपणे पालन केले जाते. यासोबतच सर्वधर्मीय सण, उत्सव एकत्रितरित्या साजरे करून सर्व धर्मसमभावही जोपासला जातो. शेजारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडूनही त्यांची आस्थेने चौकशी केली जात आहे.

या रुग्णांचा ताबा मिळवण्यात सुरुवातीला फार अडचणी आल्याचे आकांक्षाने सांगितले. सर्वप्रथम भाषेची अडचण जाणवली. याशिवाय जागा मिळवण्यातही अडचणी आल्या. या अडचणींवर मात करत ऑगस्ट महिन्यापासून ‘होम अगेन’ सुरू झाले. या रुग्ण महिलांच्या देखभालीसाठी संस्थेमार्फत 8 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयातून सुट्टी घेतल्यानंतर आता या महिला बाहेरच्या वातावरणात स्थिरावल्या आहेत. या रुग्ण महिला घरगुती कामेही करत असून, त्यांना त्या प्रमाणात आर्थिक मोबदलाही देण्यात येत आहे. मिळणार्‍या पैशातून त्या खाऊ, कपडे आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेऊ लागल्या आहेत. बजाज फायनान्स आणि हंस फाऊंडेशन दिल्ली यांच्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. या रुग्णांना नियमित औषधे दिली जातात. मोकळ्या वातावरणात आल्यामुळे त्यांच्या तब्बेतीत पहिल्यापेक्षा सुधारणा झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची वेळोवेळी तपासणी आणि आवश्यक सहकार्य करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या