
सामना ऑनलाईन । मुंबई
गजबजलेल्या परिसरातील कपड्यांच्या दुकानात घुसायचे. खरेदी करण्याचा बहाणा करायचा आणि संधी मिळताच शॉपिंगला आलेल्या महिलांची पर्स उचलून पसार व्हायचे अशा प्रकारे पर्स चोरी करण्यात एक्स्पर्ट असलेल्या महिलेला शिवाजी पार्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दादरच्या एन. सी. केळकर मार्गावरील किओरा लेडीज कपड्यांच्या दुकानात 13 जानेवारीला चोरी झाली होती. शॉपिंगला आलेल्या एका महिलेची पर्स चोरीला गेली होती. याप्रकरणी शिवाजी पार्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संजय जगताप तसेच प्रमोद सूर्यवंशी, महेंद्र पाटणे, विठ्ठल जाधव, संदीप पाटील आणि सतीश लिमळे हे पथक या गुह्याचा तपास करीत होते. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला पर्स चोरून नेताना कैद झाली होती, पण तिचा काहीच ठावठिकाणा मिळत नव्हता. अखेर फुटेजमधील ती महिला ठाण्यातील कोपर येथे राहत असल्याची खबर जगताप यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोपर येथील झोपडपट्टीत धडक देऊन दीपाली रोकडे (34) या महिलेला ताब्यात घेतले. त्या महिलेने पर्स चोरल्याची कबुली दिली. दीपाली ही सराईत पर्स चोर असून तिच्या विरोधात ठाणे, मुंबई, नवी मुंबईत गुन्हे दाखल आहेत.
सीसीटीव्हीत दिसते म्हणून पटकन पळते
महिला ग्राहक ज्या दुकानात जास्त आहेत त्या दुकानात चोरी करण्यासाठी घुसते. संधी मिळाली की लगेच पर्स उचलून तेथून सटकते. कारण सीसीटीव्हीत सर्व दिसत असते. त्याच वेळी आपण पकडले जाऊ नये म्हणून मागेपुढे न बघता थेट पळतच सुटते असे दीपालीचे म्हणणे आहे. शिवाय दीपाली झोपडपट्टीत राहत असली तरी अगदी चांगले कपडे, मेकअप करून ती शॉपिंग करण्याच्या बहाण्याने दुकानात जाते. त्यामुळे तिच्यावर कोणाला संशय येत नाही अशी तिची मोडस ऑपरेंडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































