लाहेरीच्या नागरिकांचा नक्षलवाद्यांविरुद्ध एल्गार

369

नक्षलवाद्यांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन केले. मात्र, भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱया नागरिकांनी नक्षल्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. नक्षल्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी लावलेल्या बॅनरची नागरिकांनी होळी करून आपला संताप व्यक्त केला. नक्षल्यांनी लाहेरी, मल्लमपोडूर, भुसेवाडा, कुक्कामेटा, लष्कर, आलदंडी, गोपणार या भागात बॅनर व पोस्टर्स लावून नागरिकांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. नक्षल्यांनी केलेल्या आवाहनास प्रत्युत्तर देण्यासाठी परिसरातील 200-300 नागरिकांनी एकत्र येत नक्षल्यांच्या बॅनरची होळी केली व नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

नक्षलवादी स्वतःच्या फायद्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात. मात्र आमच्या भागाच्या विकासासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होत असून, मोठय़ा संख्येने मतदान करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लाहेरी परिसरातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. या भागातील नागरिकांचा कित्ता इतर भागातील नागरिकांनीही गिरवून नक्षलवाद्यांचा विरोध करीत लोकशाही बळकट करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या