
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर येथे ओबीसी मेळाव्यासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दगडफेकीत हाके यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी, संभाजी सप्रे, गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले – मनोज जरांगे
या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले करून घेतात. स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. हे लोक दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात आणि मग त्यावर राजकारण करतात. अशा जातीयवाद पसरवणाऱया लोकांकडे लक्ष द्यायचं कारण नाही,’ असा हल्लाबोल जरांगे-पाटील यांनी केला.