अवघ्या 24 व्या वर्षांच्या अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टी हादरली

मल्याळम चित्रपटांमधील भूमिकांमुळे लोकप्रिय अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचे निधन झाले आहे. ती 24 वर्षांची होती. लक्ष्मिकाचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कळाले आहे. सौदी अरब अमिरातीतील शारजाहमध्ये तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामुळे तिचे निधन झाले. लक्ष्मिका ही शारजाहमधील एका बँकेत काम करत होती. लक्ष्मिकाच्या अकस्मात निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

लक्ष्मिका सजीवन ‘कक्का’ नावाच्या मल्याळम लघुपटामुळे प्रसिद्ध झाली होती. या लघुपटात तिने पंचमी नावाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. केवळ प्रेक्षकच नाही तर समीक्षकांनीही तिच्या या भूमिकेचे कौतुक केले होते. हा लघुपट अजू अजेश यांनी दिग्दर्शित केला होता आणि वेलिथिरा प्रॉडक्शन, 9 एएम शिबू मोईदीन प्रॉडक्शन आणि एनएनजी फिल्म्सच्या बॅनरने या लघुपटाची निर्मिती केली होती. 14 एप्रिल 2021 रोजी, चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Neestream वर प्रदर्शित झाला असून त्याला अॅपवर 60 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लक्ष्मिका ही या लघुपटाशिवाय ‘पुढायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सौदी वेल्लाक्का’, ‘उयारे’, ‘ओरू कुट्टनादन ब्लॉग’, ‘ओरू यमंदन प्रेमकथा’ आणि ‘नित्यहरिथा नायगन’ या चित्रपटामध्येही झळकली होती. प्रशांत बी मोलिकल दिग्दर्शित आणि 2021 साली प्रदर्शित झालेला ‘कून’ हा चित्रपट तिचा अखेरचा चित्रपट ठरला. ‘पूजयम्मा’ चित्रपटात तिने साकारलेली देवयानी नावाच्या शिक्षिकेची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. विजेश मणी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता.