
हिंदुस्थानचा झुंजार खेळाडू लक्ष्य सेनने अखेर या वर्षीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम लढतीत जपानच्या युशी तनाकाचा 21-15, 21-11 अशा सरळ गेममध्ये पराभव करीत केवळ 38 मिनिटांत विजेतेपदावर नाव कोरले. लक्ष्यने कानांवर बोटे ठेवून खास शैलीत सेलिब्रेशन करत जेतेपदाचा आनंद साजरा केला.
24 वर्षीय लक्ष्य सेन हा मूळचा उत्तराखंडातील अल्मोडा असून, पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळाल्यानंतर तो फॉर्मशी संघर्ष करत होता, मात्र या स्पर्धेत त्याने दमदार पुनरागमन करत उपांत्य फेरीत चिनी तैपेईच्या चोउ तियेन चेनचा पराभव करत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले होते.
तनाकाविरुद्ध एकतर्फी मात
या वर्षी ऑरलियन्स मास्टर्स आणि यूएस ओपन सुपर 300 स्पर्धा जिंकलेल्या आणि जागतिक क्रमवारीत 26व्या क्रमांकावरील तनाकाविरुद्धच्या किताबी लढतीत लक्ष्यने सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवले. अचूक प्लेसमेंट, जबरदस्त कोर्ट कव्हरेज आणि शुद्ध स्ट्रोकमेकिंगच्या जोरावर लक्ष्यने सामना दोन गेममध्येच संपवला.


























































