लालबागच्या राजासाठी धर्मादाय आयुक्तांचे सहकार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalbaug-cha-raja

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दरवर्षी दोन कोटी भाविक येतात. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राहावी. भाविकांना कुठल्याही जाचाविना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी आता धर्मादाय आयुक्तांनी मंडळाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या आधी आयुक्त बैठक घेणार असून त्यांच्या या भूमिकेचे ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाने स्वागत केले आहे.

‘लालबागचा राजा’च्या दानपेटय़ा, हुंडय़ांतील रक्कम अतिशय काटेकोरपणे मोजण्यात येते. या वेळी धर्मादाय आयुक्तांचा प्रतिनिधी दरवर्षी असतो. याशिवाय गणेशोत्सवासाठी रांगेचे नियोजन आणि इतर सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाकडून बैठक घेण्यात येते. या वेळी पोलीस प्रशासनाचाही यात सहभाग असतो. मात्र आता भाविकांची वाढलेली संख्या पाहता धर्मादाय आयुक्तांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला धर्मादाय आयुक्तालयातील एक प्रतिनिधी असेल. याशिवाय सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमण्याचाही निर्णय घेतला. हे सर्व ‘लालबागचा राजा’च्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठीच असल्याने मंडळाने याचे स्वागतच केल्याचे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.

कर नाही त्याला डर कशाला

लालबागचा राजा मंडळाचा सर्व कारभार पारदर्शक असतो. आयकर खाते, धर्मादाय आयुक्त खाते, हुंडय़ा आणि दानपेटय़ांची मोजदाद सर्व काही अतिशय काटेकोरपणे होते. सर्व हिशोब चोख असतो. तसेच लालबागचा राजा आणि भक्त यांचे थेट नाते आहे. भक्तांची संख्याही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जो कुणी पुढे येईल त्याचे स्वागतच आहे, कर नाही त्याला डर कशाला असे सुधीर साळवी यांनी सांगितले.