
‘लालबागचा राजा’च्या चरणी वाहिलेल्या सोने-चांदीचे दागिने आणि वस्तूंना लाखोंचे मोल आले. राजाला आलेल्या वस्तूंचा सोमवारी सायंकाळी लालबाग येथे लिलाव पार पडला. या वेळी एका भक्ताने वाहिलेल्या एक किलो सोन्याचे ताट, वाटी आणि चमचाची तब्बल 42 लाख 60 हजार रुपयांना विक्री झाली. तर एक किलो सोन्याची कॅडबरी चक्क 39 लाख रुपयांना विकली गेली.
गणेशोत्सव काळात ‘लालगाबचा राजा’च्या चरणी भक्तांनी मोठय़ा प्रमाणात सोने-चांदीचे दागिने, हिरेजडीत मुकुट, बाप्पाच्या मूर्ती, मुशक, मोदक, हार, गद अशा वस्तू अर्पण केले आहेत. त्याचा आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी यांच्या उपस्थितीत चार तास लिलाव पार पडला. या वेळी 103 वस्तूंच्या लिलावातून तब्बल एक कोटी 25 लाख 41 हजार रुपये जमा झाले. राजाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी भक्तांची मोठी झुंबड उडाली होती.
























































