फॉरमॅट बदलामुळे आयपीएलला हजारो कोटींचा फटका, मूळ कराराचा भंग केल्याचा ललित मोदींचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक खळबळजनक दावा करत लीगच्या सध्याच्या फॉरमॅटवर थेट निशाणा साधला आहे. आयपीएलचा मूळ ‘होम-अँड-अवे’चा फॉरमॅट न पाळल्यामुळे आयपीएलला तब्बल 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

मोदी यांनी सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोनदा खेळणे अपेक्षित होते. 2022 मध्ये संघसंख्या 10 झाल्यानंतर या पद्धतीनुसार लीग टप्प्यात 90 सामने आणि त्यानंतर चार नॉकआउट सामने होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या केवळ 74 सामन्यांवर स्पर्धा मर्यादित ठेवण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

प्रत्येक सामन्यातील 50 टक्के महसूल बीसीसीआयकडे जातो, तर उर्वरित रक्कम संघांमध्ये विभागली जाते. त्यामुळे 20 सामने कमी झाल्याने संघांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. त्यांनी हा थेट ‘कराराचा भंग’ असल्याचेही म्हटले.

मोदींच्या मते, ‘होम-अँड-अवे’ फॉरमॅटमध्येच आयपीएलची खरी व्यावसायिक ताकद दडलेली आहे. जर कॅलेंडरमध्ये जागा नसेल तर संघसंख्या वाढवू नका हा साधा नियम आहे. हा करार आम्ही केला नसल्याचेही ते म्हणाले.

आयपीएलच्या वाढत्या ब्रँड व्हॅल्यूच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयसमोर नव्या चर्चेला तोंड फुटले असून, भविष्यात फॉरमॅटमध्ये बदल होणार का याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.