
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.जेसीबीच्या सहाय्याने आंबा घाटातील रस्त्यावर आलेली दरड हटविण्याचे काम सुरु होते. गेल्या 24 तासात रत्नागिरीत सरासरी 87 मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यंदा गणेशोत्सवात पावसाने कहर केला. गणपती आगमनापासून सुरु झालेला संततधार पाऊस सुरुच आहे. शनिवारी गौरी गणपती विसर्जनावरही पावसाचे सावट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 553 घरगुती आणि 14 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे.

























































