
सामना प्रतिनिधी। लांजा
लांजा तालुक्यातील पन्हले आनंद गावात एका मनोरुग्ण पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करत तिची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. समीक्षा म्हसने (32) असे मृत महिलेचे नाव असून संजय (34) असे आरोपीचे नाव आहे.
रविवारी सकाळी समीक्षा व संजय यांचे भांडण झाले होते. त्यानंतर समीक्षा बेलाची उतरन या ठिकाणी काजूच्या बागेत लाकूड आणण्यासाठी गेली होती. हे बघून संजय देखील तिच्या मागे गेला. त्यानंतर त्याने अचानक जवळील कोयत्याने समीक्षाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर तसेच अंगावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. दरम्यान संजय समीक्षाच्या मागे कोयता घेऊन गेल्याचे तिच्या जावेने बघितले. व त्याबद्दल तिने लगेच सासऱ्यांना कळवले. त्यानंतर संजयचे वडील व इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. अतिरक्तस्त्रावामुळे समीक्षाचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणी लांजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
































































