
एका तरूणाचा साखरपुडा मोडल्याच्या संशयावरून आज सायंकाळी पाच वाजता लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. यात ती पन्नास टक्के भाजली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य संशयित फरार आहे.
लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथील एक महिला आज सायंकाळी पाचच्या सुमारास लासलगाव बसस्थानकात उभी होती. याचवेळी तिच्याच गावातील तिच्याशी परिचित असलेले तिघे तरूण तेथे आले, त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, यात ती पन्नास टक्के भाजली. तिच्यावर निफाड येथे प्रथमोपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर भागवत (22) हा फरार असून, त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महिलेच्या जबाबानुसार कारवाई करू – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. या महिलेने दिलेल्या जबाबानुसार चौकशी करून याप्रकरणी निश्चितच कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या महिलेने आपल्या मुलांबद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे सांगतानाच बाटल्यांमध्ये खुले पेट्रोल विकणाऱया पंपांवरही कारवाई केली जाईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हेसुद्धा उपस्थित होते.


























































