कश्मीरमध्ये लश्करचा क्रूर दहशतवादी बांगरूचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर येथील फतेह कदाल भागात उडालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात लश्कर-ए-तोएबाचा खुंखार दहशतवादी मेहराज बांगरू याचाही खात्मा करण्यात हिंदुस्थानी लष्कराला यश आले आहे. या चकमकीमध्ये हिंदुस्थानचा एक जवानही शहीद झाला. कमल किशोर असे शहीद जवानाचे नाव आहे. दरम्यान, बांगरूचा खात्मा हे लष्कराचे मोठे यश असून बऱ्याच काळापासून त्याचा शोध सुरू होता.

जम्मू-कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी या चकमकीची माहिती दिली. दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती मिळताच शहरातील सर्वात वर्दळीचा असणारा फतेह कदाल भागात लष्कराने शोधमोहीम सुरू केली. लष्कराने चकमकीत मेहराज बांगरू, फहद वजा आणि रईस या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रईस याच्या घरात दहशतवाद्यांनी आसरा घेतला होता आणि त्याच घरात त्याच्यासह अन्य दोघांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले, असे दिलबाग सिंह यांनी सांगितले.

लष्कराने खात्मा केलेला खुंखार दहशतवादी बांगरू याच्यावर हत्या, लुटपाट, हत्यारांची लुटपाट आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे अनेक गुन्ह्यांची नोंद होती. श्रीनगरमध्ये लश्कर-ए-तोएबाचा तो कमांडर होता. याच वर्षी सुरक्षादलाने खोऱ्यास सक्रिय असणाऱ्या टॉप 10 कमांडरांची यादी जाहीर केली होती, यात बांगरू याचेही नाव होते. बांगरू याचा खात्मा केल्यानंतर आता लष्कराच्या हिटलिस्टवर रियाज नायकू, जाकिर मूसा आणि पोलिसांच्या कस्टडीतून पळालेला पाकिस्तानी दहशतवादी नावीद जट उर्फ अबू हंजाउल्ला हा आहे.

खोऱ्यात सक्रिय असणारे टॉप 10 कमांडर –
1) रियाज नायकू – खोऱ्यातील हिजबूल मुजाहिदीनचा चीफ
2) नावीद जट – लश्कर-ए-तोएबा
3) जीनत उल इस्लाम – शोपियामधील हिजबूलचा कमांडर
4) जाकिर मूसा – अनसर घजवट उल हिंदचा प्रमुख
5) अल्ताफ कचरू – कुलगाममध्ये हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर
6) लतीफ टाइगर – बुरहान ग्रुपकडून सक्रिय असणारा हिजबूल कमांडर
7) अरशैद उल हक – पुलवामामध्ये हिजबूल मुजाहिदीन कमांडर
8) जाहिद शेख उर्फ उमेर अफगानी – जैश-ए-मोहम्मद कमांडर
9) अशरफ मोलवी – हिज्बुल मुजाहिदीन कमांडर अनंतनाग
10) मेहराज बांगरू – लश्कर-ए-तोएबाचा कमांडार (खात्मा करण्यात आला)