व्यावसायिक स्पर्धेसाठी संघटनेला वेळच मिळेना, गेली दोन वर्षे कबड्डी निवड चाचणी व्यावसायिक संघांच्या स्पर्धेविना

ज्या संघातील खेळ पाहून खेळाडूंची मोठमोठय़ा व्यावसायिक संघात निवड केली जाते, ज्या संघांचा खेळ पाहायला कबड्डीप्रेमींची तोबा गर्दी होती, अशी व्यावसायिक संघांची निवड चाचणी स्पर्धा गेले दोन वर्षे होऊ शकली नाही. संघटनेने वेळात वेळ काढून अन्य सर्व गटाच्या निवड चाचणी स्पर्धा टप्प्याटप्प्याने आयोजित केल्या, पण व्यावसायिक संघांची स्पर्धा घ्यायला ना त्यांच्याकडे वेळ होता ना त्यांची मानसिकता. त्यामुळे व्यावसायिक संघांच्या निवड चाचणी स्पर्धेबाबत अनिश्चितता पसरली आहे.

हिंदुस्थानच्या संघात महाराष्ट्राचा एकही खेळाडू स्थान मिळवू शकत नसला तरी मुंबईसह राज्यात कबड्डी मोठय़ा प्रमाणात वाढतेय. मुंबईत तर कबड्डीचे हजारांपेक्षा अधिक संघ आहेत. त्यामुळे कबड्डी खेळणाऱया संघांसाठी दरवर्षी होणारी निवड चाचणी स्पर्धा एकप्रकारे वर्ल्ड कपच त्यामुळे या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा स्पर्धेत गेली दोन वर्षे व्यावसायिक संघांच्या स्पर्धेकडे संघटक कानाडोळा करत असल्याची तक्रार व्यावसायिक संघांनीच केली आहे.

व्यावसायिक नव्हे व्यवसाय स्पर्धा

व्यावसायिक संघात खेळणारे बहुतांश संघ बोगस आहेत. केवळ स्पर्धेसाठी जमवाजमव करून संघ तयार केले जातात आणि एखाद्या गुमास्ता परवाना असलेल्या आस्थापनाला व्यावसायिक संघाची मान्यता दिली जाते. ना ती संस्था खेळाडूंना मानधन देते ना नोकरी. व्यावसायिक संघातून खेळाडूंची कोणत्याही स्पर्धेसाठी निवडही केली जात नाही. तरीही या व्यावसायिक संघांच्या नावाखाली कबड्डीच्या मतदारांची यादी वाढवली जात आहे.

व्यावसायिक संघाच्या चाचणीला अर्थच नाही

अन्य गटांच्या स्पर्धेतून खेळाडूंची निवड केली जाते, पण व्यावसायिक संघांच्या स्पर्धेतून कुणाचीही निवड केली जात नाही. त्यामुळे या स्पर्धेला खऱया अर्थाने काही अर्थच नाही. त्यामुळे जे मुख्य संघ आहेत ते हजेरी लावण्यापुरते येतात तर काही संघ आपले दुय्यम संघ पाठवतात. अशी अर्थ नसलेली स्पर्धा आता बंद करायला हवी, असा सूर दबक्या आवाजात कबड्डी संघटक काढत आहेत.

लवकरात लवकर स्पर्धा घ्या

एखाद्या पंपनीत किंवा सरकारी आस्थापनांमध्ये नोकरी लागावी या हेतूने व्यावसायिक स्पर्धांची सुरुवात झाली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया खेळाडूला मोठय़ा पंपन्या सहज आपल्या संघांशी करारबद्ध करायच्या. अनेक खेळाडूंना या स्पर्धेत खेळल्यावर नोकऱयाही लागल्या आहेत. परंतु आता कबड्डीपटूंची कपंनीतल्या नोकरभरती मंदावल्या आहेत. अशात ही निवड चाचणी व्यावसायिक संघांनी जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. पण संघटनेला याचे काहीही पडलेले नाही. त्यांनी गेल्या वेळी केवळ स्पर्धा जाहीर केली, पण स्पर्धाच घेतली नाही. ही स्पर्धा न घेतल्यामुळे संघटनेला आर्थिक नुकसानही झाले. त्यामुळे संघटनेने आता कोणतेही कारण न देता लवकरात लवकर स्पर्धा घ्यावी.

राम पाटील, सिद्धी कन्सट्रक्शन व्यावसायिक संघ

आम्ही कळवले, पण कुणी आलेच नाही

आम्ही व्यावसायिक संघांच्या स्पर्धेबाबत सर्व संघांना कळवले, पण संघांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्यामुळे आम्ही स्पर्धाच घेऊ शकलो नाही. आम्ही दोनदा संस्थांना कळवले. मात्र आता आम्ही व्यावसायिक गटाच्या सर्व स्पर्धा दसऱयानंतर एकत्र घेणार आहोत.

विश्वास मोरे,, सरचिटणीस, शहर कबड्डी संघटना