
सामना प्रतिनिधी । मुंबई
इंग्लंडमध्ये येत्या 30 मेपासून सुरू होणार्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या संघातील 13 खेळाडूंची नावे बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने जवळजवळ निश्चित केली आहेत. त्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी आता सहा जणांना वर्ल्ड कपचे तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील झटपट मालिकांत अखेरचा पेपर द्यावा लागणार आहे. त्यात कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास सक्षम असलेला मुंबईकर अजिंक्य रहाणे, हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून इंग्लंड लायन संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा के. एल. राहुल, यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत, दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज खलील अहमद यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया संघ हिंदुस्थानात 2 टी-20 आणि 5 वन डे लढतींच्या मालिका खेळणार आहे. या मालिकांना येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. येत्या विश्वचषकाआधीच्या या शेवटच्या झटपट क्रिकेट मालिका ठरणार आहेत. त्यामुळे बलाढय़ कांगारूंविरुद्धच्या मालिकांत चमकदार खेळ करीत टीम इंडियाच्या विश्वचषक संघात स्थान मिळविण्यासाठी रहाणे, कार्तिक, पंत, उनाडकट, राहुल आणि खलील या सहा जणांना ही शेवटची संधी ठरणार आहे. उद्या शुक्रवारी क्रिकेट बोर्डाची राष्ट्रीय निवड समिती कांगारूविरुद्धच्या टी -20 आणि वन डे मालिकांसाठी टीम इंडियाची निवड करणार आहे. या निवडीनंतर इंग्लंडमधील वर्ल्ड कपच्या तिकिटासाठी आणखी कुणाला संधी मिळू शकेल ते स्पष्ट होणार आहे. उनाडकटने यंदा रणजी हंगामात जोरदार कामगिरी करीत सौराष्ट्र संघाला अंतिम फेरीत मजल मारून दिली आहे. तो आता परिपक्व वेगवान गोलंदाज झाला असून त्याच्या चेंडूंचा वेगही वाढला आहे. खलिलनेही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौर्यात आपल्या वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे बुमराह, शमी आणि भुवनेश्वर या त्रिकुटाच्या साथीला विश्वचषकात चौथा वेगवान गोलंदाज कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे. संघात दुसरा अतिरिक्त यष्टिरक्षक फलंदाज घ्यायचे ठरल्यास त्या जागेसाठी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांत खरी चुरस लागणार आहे.
वर्ल्ड कपसाठी 13 खेळाडूंची निवड निश्चित
बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने याआधीच इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 13 खेळाडूंची जवळजवळ निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. टीम इंडियाच्या विश्वचषक चमूत कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी निवड निश्चित मानली जात आहे. निवड समिती 16 ते 17 जणांपेक्षा अधिक खेळाडूंना संघात स्थान देऊ शकत नसल्यामुळे वर्ल्ड कपच्या संघात आता केवळ दोन जागा उरल्या आहेत.





























































